Pune News : सिंहगड खोऱ्यात मुसळधार पाऊस ; वरदाडेचा पर्यायी पूल वाहून गेला, 60 गावांचा संपर्क तुटला
Pune News : मध्यरात्रीच्या सुमारास वरदाडे येथील पुलाखालच्या मोऱ्यांसह मालखेड हद्दीतील रस्ताही वाहून गेला.

पुणे : सिंहगड खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पुणे–पानशेत मार्गावरील वरदाडे येथील पर्यायी पूल आणि रस्ता महापुरात वाहून गेल्याने हवेली, राजगड आणि मुळशी तालुक्यातील सुमारे ६० गावांचा संपर्क तुटला आहे. या घटनेसाठी पुणे बाह्यवळण (रिंग रोड) प्रकल्पाचे ठेकेदार आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांना जबाबदार धरत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार भीमराव तापकीर यांनी केली आहे.
रिंग रोडच्या कामासाठी उभारण्यात आलेला पर्यायी रस्ता आणि पूल निकृष्ट व चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आल्याचा आरोप तापकीर यांनी केला. अतिवृष्टीमुळे ओढ्याला आलेल्या महापुराचा तडाखा बसत हा पूल आणि रस्ता पूर्णपणे खचल्याने हजारो नागरिकांचा बाह्य जगाशी संपर्क तुटला असून, स्थानिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे २ वाजल्यापासून सकाळी १० वाजेपर्यंत परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर काही काळ पावसाचा जोर कमी झाला असला तरी दुपारनंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्रीच्या सुमारास वरदाडे येथील पुलाखालच्या मोऱ्यांसह मालखेड हद्दीतील रस्ताही वाहून गेला.
दरम्यान, वसवेवाडी मार्गे वरदाडेकडे जाणाऱ्या घेरा सिंहगड–थोपेवाडी पुलावरही महापुराचे पाणी चढल्याने तो मध्यरात्रीपासून पाण्याखाली गेला. परिणामी या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली असून, नागरिकांना मोठा फटका बसला आहे.
या घटनेनंतर नुकसानग्रस्त भागाची तातडीने पाहणी करून दोषी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच नागरिकांसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था उभी करावी, अशी मागणी आमदार भीमराव तापकीर यांनी केली आहे.





