Khalapur News : बाजारपेठेत माकडांचा थरार! घरात घुसून वस्तूंची फेकाफेक; नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण
Khalapur News : चौक बाजारपेठ परिसरात माकडांच्या टोळ्यांचा घरांमध्ये शिरकाव; अन्नधान्य पळवणे आणि भांडी फोडण्याच्या प्रकारांमुळे गृहिणींमध्ये संतापाची लाट.

Khalapur News – चौक बाजारपेठेच्या लगत असलेल्या घरांमध्ये माकडांचा वाढता उपद्रव चिंतेचा विषय ठरला असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माकडांकडून घरात घुसून होणाऱ्या उपद्रवांमुळे नागरिक हैराण झाले असून, त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात माकडांची संख्या वाढली आहे.
माकडे घरांच्या छपरांवर बसून नासधूस करत असून, काही वेळा थेट घरात घुसून भांडी पाडणे, अन्नधान्य पळवणे, पाण्याचे नळ सुरू ठेवणे तसेच उन्हात ठेवलेले खाद्यपदार्थ उचलून नेणे असे प्रकार घडत आहेत. लहान मुलांना धाक दाखवणे, अंगावर धावून येणे यामुळे नागरिकांमध्ये भीती वाढली आहे.
या उपद्रवामुळे शाळकरी मुलांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचेही दिसून येत आहे. माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी जाळे लावणे किंवा इतर उपाययोजना तात्काळ राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे करण्याचे ठरवले आहे. प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
“चौक बाजारपेठ परिसरातील घरांमध्ये माकडांकडून सातत्याने उपद्रव सुरू आहे. खिडक्यांमधून घरात घुसणे, वस्तू फेकणे, अंगावर धावून येणे असे प्रकार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.”
– अभिजीत चौधरी, ग्रामस्थ





