Baramati Water Cut: बारामतीकरांनो पाणी जपून वापरा! शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा; जाणून घ्या तुमच्या भागाचे वेळापत्रक
Baramati Water Cut: वाढते तापमान आणि मर्यादित पाणीसाठ्यामुळे नगर परिषद प्रशासनाचे पाऊल; कालव्याचे आवर्तन सुरू होईपर्यंत कपात कायम राहणार.

Baramati Water Cut – यंदाच्या वर्षी एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनने अपेक्षित साथ न दिल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. बारामती शहरालाही या परिस्थितीचा फटका बसला असून शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा असलेला नीरा डावा कालव्याचे आवर्तन सध्या बंद असल्याने आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही. परिणामी मंगळवार (दि. 23 जून) पासून बारामती शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी दिली आहे.
यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणे, तलाव आणि जलस्रोतांमधील पाणीसाठा झपाट्याने घटला आहे. त्यातच वाढते तापमान आणि पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी यामुळे अनेक शहरांमध्ये पाणी व्यवस्थापनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. बारामती शहराचा प्रमुख पाणीपुरवठा नीरा डावा कालवा आणि त्यावरील जलस्रोतांवर अवलंबून आहे; मात्र कालव्यातील आवर्तन बंद झाल्यामुळे पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक साठा उपलब्ध होत नसल्याने नगर परिषद प्रशासनाला पाणीपुरवठ्याचे नियोजन बदलावे लागले आहे.
मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी सांगितले की, उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राखण्यासाठी एक दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नीरा डावा कालव्यातील पाण्याचा प्रवाह पूर्ववत सुरू होईपर्यंत ही व्यवस्था कायम राहणार आहे.
पाटस रिंगरोड जलशुद्धीकरण केंद्राचा पाणीपुरवठा
मंगळवार, दि. 23 जून रोजी पाणीपुरवठा होणारे भाग : कसबा परिसर, फलटण रोड, रेणुकानगर, मुल्ला वस्ती, शिक्षक सोसायटी, लक्ष्मीनारायण नगर, माळेगाव रोड, हनुमान नगर, माळेगाव कॉलनी, सातव वस्ती, शिवाजीनगर, जामदार रोड, कारभारीनगर, सावतामाळीनगर, श्रीरामनगर, चांदणी चौक, पंचशीलनगर, साठेनगर, जगताप मळा, जुना मोरगाव रोड, खंडोबानगर तसेच नवीन मोरगाव रोड परिसर. बुधवार, दि. 24 जून रोजी पाणीपुरवठा होणारे भाग : म्हाडा कॉलनी, मुजावर वाडा, देवळे इस्टेट, पानगल्ली, समर्थनगर, आमराई,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, साळवेनगर, कॅनॉल रोड, सिद्धार्थनगर, विठ्ठलनगर, सुहासनगर, चंद्रमणीनगर, वडार सोसायटी, इंदापूर रोड परिसर, एसटी स्टँड परिसर, सटवाजीनगर, जवाहरनगर, पोस्ट रोड, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, सिनेमा रोड, विजयनगर, साईगणेशनगर, अशोकनगर, आनंदनगर, वसंतनगर, अवधूतनगर, तपोवन कॉलनी, विवेकानंदनगर, ख्रिश्चन कॉलनी, महादेव मळा, सद्गुरुनगर, पतंगशाहनगर, क्षत्रियनगर, तांदुळवाडी वेस, सुभाष चौक, कचेरी रोड आदी परिसर.
सायली हिल व जळोची जलशुद्धीकरण केंद्राचा पाणीपुरवठा
मंगळवार, दि. 23 जून रोजी : तांदुळवाडी गावठाण, सहयोग सोसायटी, नीरा कॅनॉल सोसायटी, दूधसंघ सोसायटी. बुधवार, दि. 24 जून रोजी : रुई परिसर, डेरेवस्ती, सायली हिल, सूर्यनगरी, देसाई इस्टेट, अंबिकानगर, जळोची गावठाण, बायळे वस्ती, तान्हाईनगर, महिला सोसायटी, प्रगतीनगर.






