मनोहर दाभाडे तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची आगामी सार्वत्रिक निवडणूक आता रंगतदार होण्याचे संकेत स्पष्ट दिसू लागले आहेत. विविध राजकीय पक्षांच्या महत्त्वाकांक्षा, इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या आणि वाढती चाचपणी यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. सध्या संपूर्ण शहरातून सुमारे शंभराहून अधिक इच्छुक उमेदवार आपापल्या प्रभागांतून निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर झाल्याने प्रत्येक प्रभागातील उमेदवारांचे गणित आता स्पष्ट झाले आहे. तसेच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी मतदारांशी थेट संपर्क मोहीम सुरू केली आहे. घराघरात भेटी, सभांद्वारे संवाद आणि सण-उत्सवांमधून जनसंपर्क यामुळे शहरात निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि काही अपक्ष गटांनीही तयारी सुरू केली आहे. प्रत्येक जागेसाठी चार ते पाच उमेदवार इच्छुक असल्याने पक्षांतील अंतर्गत स्पर्धा तीव्र झाली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे संपर्क साधायला सुरूवात केली असून, मंडळ स्तरावरील बैठकांमध्ये उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणी स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्ये चित्र दिसत आहे. १४ प्रभाग आणि २९ सदस्य तळेगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकूण १४ प्रभाग असून प्रत्येक प्रभागातून दोन जागा निवडल्या जाणार आहेत. त्यामुळे सभागृहात २८ नगरसेवकांसह थेट जनतेकडून निवडला जाणारा एक नगराध्यक्ष असा एकूण २९ सदस्यांचा कार्यकाळ असणार आहे. शहराचे नगराध्यक्षपद देखील मतदारच ठरवणार असल्यामुळे शहरातील निवडणुकीची रंगत अधिक वाढणार आहे. नगराध्यक्षपदासाठी तीव्र चाचपणी थेट निवडणुकीमुळे नगराध्यक्षपदासाठी स्पर्धा अधिकच रंगतदार होणार आहे. शहरातील काही प्रस्थापित नेते तसेच नवोदित इच्छुक या पदासाठी चाचपणी करत आहेत. भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट), तसेच इतर पक्षांतून काही बाहुबली नेत्यांनी नगराध्यक्षपदासाठी रस दाखवला असून, त्यांनी आधीच आपापले मतदारसंघ मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. स्वबळावर लढण्याची शक्यता इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या पाहता प्रत्येक पक्षासमोर उमेदवारी ठरवणे ही डोकेदुखी ठरणार आहे. सर्वांना उमेदवारी देणे शक्य नाही, या वास्तवामुळे काही कार्यकर्ते स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. यामुळे तळेगाव नगरपरिषदेची ही निवडणूक केवळ पक्षनिहाय नाही, तर अपक्ष उमेदवारांच्या जोरदार चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीचे वारे शहरभर प्रभागांत पोस्टरबाजी, बॅनरबाजी, शुभेच्छा फलक आणि विविध उपक्रमांमुळे शहरातील वातावरण उत्साही झाले आहे. मतदारांशी संपर्क वाढवण्यासाठी सोशल मीडियाचाही वापर उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे. पक्षनिष्ठता, स्थानिक जनसंपर्क आणि वैयक्तिक लोकप्रियता या तिन्ही गोष्टींवर या निवडणुकीचे भविष्य अवलंबून राहणार असल्याचे राजकीय निरीक्षकांकडून सांगितले जात आहे.