Talegaon Dabhade : भाजपकडून इच्छुकांची गर्दी; नगरसेवक पदासाठी तब्बल ७६ अर्ज

तळेगाव दाभाडे – नुकतीच निवडणुक आयोगाकडून निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी वेगाने पाऊल उचलायला सुरूवात केली आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटासाठी मोठी उत्सुकता दिसत आहे.
नगराध्यक्ष पदासाठी चार तर नगरसेवक पदासाठी तब्बल ७६ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. लवकरच अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती पक्षाचे शहर निवडणूक प्रभारी गणेश भेगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर होताच शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या तयारीला वेग दिला आहे. भारतीय जनता पक्षात मात्र नगराध्यक्षपदासाठी चुरस अधिक तीव्र झाली आहे. या पदासाठी माजी शहराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे, गिरीश खेर आणि महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी पक्षाकडे अधिकृतपणे उमेदवारीची मागणी केली आहे. या सर्व इच्छुकांनी पक्षाच्या कार्ड कमिटीसमोर मुलाखती दिल्या असून, लवकरच चर्चा करून अधिकृत उमेदवार जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
पत्रकार परिषदेला पक्षाचे माजी राज्यमंत्री संजय भेगडे, चंद्रकांत शेटे, रवींद्र दाभाडे, रवींद्र भेगडे, इंदरमल ओसवाल, प्रकाश ओसवाल, शहराध्यक्ष चिराग खांडगे, गिरीश खेर, अशोक दाभाडे, सुरेश झेंड, आणि स्वप्नील भेगडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे स्वागत शहराध्यक्ष चिराग खांडगे यांनी केले. बैठकीचा आढावा गणेश भेगडे यांनी सादर केला, तर आभार प्रदर्शन गिरीश खेर यांनी केले.
अन्य पक्षांच्याही हालचालींना वेग
भाजपबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष यांनीही तळेगावात आपापले उमेदवार ठरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी निवडणूक बहुरंगी स्वरूपाची होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
सर्वांचे लक्ष अधिकृत यादीकडे
भाजपच्या उमेदवारीसाठी प्रभागनिहाय झालेल्या मोठ्या स्पर्धेमुळे अधिकृत यादीकडे कार्यकर्त्यांसह मतदारांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपदासाठी कोणाला अंतिम संधी मिळते आणि कोणते नवे चेहरे नगरसेवकपदी उतरतात, याबाबत तळेगावच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
१४ प्रभागांतून ७६ अर्ज दाखल
तळेगाव नगरपरिषदेच्या १४ प्रभागांकरिता पक्षाकडे एकूण ७६ अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रत्येक प्रभागात मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहेत. यामध्ये प्रभाग क्र. १४ आणि ११ मध्ये सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, या प्रभागांतील स्पर्धा सर्वाधिक रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.





