प्रभात वृत्तसेवा पुणे – लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी), पुणे घटकाने हवेली तालुक्यातील तीन महिला तलाठ्यांविरुद्ध लाच मागणी व स्वीकारप्रकरणी कारवाई करीत एकाला रंगेहाथ पकडले आहे. या तिन्ही तलाठ्यांनी जमीन खरेदी-विक्रीसाठी आवश्यक असलेल्या ७/१२ आणि ८ अ उताऱ्यांच्या प्रती देण्यासाठी सरकारी फी व्यतिरिक्त लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.तक्रारीनुसार, प्रेरणा बबन पारधी (वय ३०, तलाठी सांगरूण) यांनी २४० प्रतींसाठी १६ हजार ४०० रुपये मागितले. दीपाली दिलीप पासलकर (२९ तलाठी बहुली) यांनी १०६ प्रतींसाठी ४ हजार ९१० रुपये मागितले. तर शारदादेवी पुरुषोत्तम पाटील (४० तलाठी खडकवाडी-कुडजे) यांनी ३२ प्रतींसाठी १ हजार ५२० रुपये मागितले.तक्रारदार हा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. त्याला मौजे सांगरूण, बहुली, खडकवाडी व कुडजे (ता. हवेली) येथील जमिनीचे संगणकीकृत उतारे आवश्यक होते. या कामासाठी संबंधित तलाठ्यांनी एकूण सुमारे २३ हजार रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारदाराने १९ सप्टेंबर रोजी एसीबीकडे तक्रार केली होती. पडताळणीच्या वेळी आरोपींनी मागणी मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर २५ सप्टेंबर रोजी सापळा लावून कारवाई करण्यात आली. यावेळी शारदादेवी पाटील यांना तक्रारदाराकडून दोन रुपयांची लाच स्वीकारताना तहसीलदार कार्यालयाजवळ रंगेहाथ पकडण्यात आले. या तिन्ही तलाठ्यांविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील व अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे व खंडेराव रंजवे यांच्या पथकाने केली. एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय अधिकारी-कर्मचारी जर सरकारी कामासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असतील तर त्वरित एसीबी कार्यालयाशी संपर्क साधावा.