#T20WorldCup | नामिबियाचा स्कॉटलंडवर विजय

अबुधाबी – नामिबियाने येथे सुरू असलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत तुलनेने प्रबळ स्कॉटलंडचा 4 गडी राखून पराभव केला.
स्कॉटलंडचा डाव 109 धावावर रोखल्यानंतर नामिबियाच्या डावाची सुरुवात चांगली झाली. मात्र, सलामीवीर फलंदाज मायकल वॅन लिंगेनने आपली विकेट बहाल केली. यावेळी संघाच्या 28 धावा झाल्या होत्या. त्यानंतर कर्णधार ग्रहार्ड इरासमस व जेन ग्रीनने निराशा केली. क्रेग विल्यम्सने एक बाजू सांभाळत फलंदाजी केली. तो देखील एका अप्रतिम चेंडूवर चकला व यष्टीचीत बाद झाला. त्याने 29 चेंडूत 1 चौकार फटकावताना 23 धावा केल्या. तो बाद झाल्यावर डेव्हीड वीसे 16 धावा काढून बाद झाला. जेन फ्रॅलिंकनेही निराशा केली. जेजे स्मिथने मात्र, पिकी फ्रांक्ससह संघाला विजय मिळवून दिला. स्मिथ 23 चेंडूत 2 चौकार व 2 षटकाराच्या मदतीने 32 धावा काढून नाबाद राहिला.
नामिबियाच्या गोलंदाजीसमोर स्कॉटलंड संघाचा डाव 109 धावांवर संपला. स्कॉटलंडच्या मायकल लिस्क, ख्रिस ग्रीव्हज व मॅथ्यु क्रॉस यांनाच दोनअंकी धावा करता आल्या. नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरासमसने स्कॉटलंडला प्रथम फलंदाजी दिली.
नामिबियाच्या रुबेन ट्रम्पेलमनने पहिल्याच षटकांत स्कॉटलंडचे तिन फलंदाज तंबूत धाडले. मायकल लिस्कने 44, ख्रिस ग्रीव्हजने 25 तर, मॅथ्यु क्रॉसने 19 धावा केल्यामुळे त्यांना शतकी धावसंख्या उभारून देता आली. नामिबियाकडून रुबेन ट्रम्पेलमनने 3 तर, जेन फ्रेलिंकने 2 गडी
बाद केले.
संक्षिप्त धावफलक
स्कॉटलंड – 20 षटकांत 8 बाद 109 धावा. (मायकल लिस्क 44, ख्रिस ग्रीव्हज 25 , मॅथ्यु क्रॉस 19, रुबेन ट्रम्पेलमन 3-17, जेन फ्रेलिंक 2-10). नामिबिया – 19.1 षटकांत 6 बाद 115 धावा. (क्रेग विल्यम्स 23, मायकल वॅन लिंगेन 18, डेव्हिड वीसे 16, जेजे स्मिथ नाबाद 32, मायकल लिस्क 2-12).




