कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एक चित्त्याचा मृत्यू! प्रोजेक्ट चित्ताला मोठा धक्का, 8 वर्षीय नभा ठार

Project Cheetah News: मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत आणलेल्या चित्त्यांपैकी एक मादी चित्ता ‘नभा’चा शनिवारी मृत्यू झाला. नभा ही नामिबियाहून भारतात पुनर्वसन प्रकल्पांतर्गत आणलेल्या चित्त्यांपैकी एक होती. एका आठवड्यापूर्वी शिकार करताना ती जखमी झाली होती आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, नभा गंभीर जखमी अवस्थेत होती आणि तिला वाचवण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले.
काय म्हणाले प्रोजेक्ट चित्ताचे अधिकारी?
प्रोजेक्ट चित्ताचे फील्ड डायरेक्टर उत्तम शर्मा यांनी सांगितले की, नभा एका आठवड्यापूर्वी शिकार करताना जखमी झाली होती. ती सॉफ्ट रिलीज एन्क्लोजरमध्ये शिकार करण्याच्या प्रयत्नात असताना जखमी झाली असावी. तिच्या डाव्या पायातील उल्ना आणि फायब्युला या दोन्ही हाडांना फ्रॅक्चर झाले होते. याशिवाय तिला इतरही जखमा झाल्या होत्या. सध्या तिच्या मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.
कुनोमध्ये आता किती चित्ते शिल्लक?
नभाच्या मृत्यूनंतर कुनो नॅशनल पार्कमध्ये आता एकूण 26 चित्ते शिल्लक आहेत. यामध्ये नऊ प्रौढ चित्ते (सहा मादी आणि तीन नर) आणि 17 पिल्लांचा समावेश आहे. हे पिल्लं कुनो नॅशनल पार्कमध्येच जन्मलेले आहेत. यापैकी 16 चित्ते सध्या जंगलात मुक्तपणे फिरत असून त्यांचे प्रदर्शन चांगले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे चित्ते पर्यावरणाशी जुळवून घेत आहेत आणि इतर शिकारी प्राण्यांसोबत सहअस्तित्व शिकले आहेत. ते नियमितपणे शिकार करत आहेत. नुकतेच सर्व चित्त्यांसाठी अँटी-एक्टो-पॅरासिटिक औषधांचा कोर्स पूर्ण करण्यात आला आहे. दोन माद्या, वीरा आणि निर्वा, यांची अलीकडेच जन्मलेली पिल्लं त्यांच्यासोबत निरोगी असून त्या शिकारही करत आहेत.
प्रोजेक्ट चित्ताला धक्का –
प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत 2022 मध्ये नामिबियाहून आठ आणि 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून बारा चित्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये आणले गेले. यापैकी आठ प्रौढ चित्ते आणि पाच पिल्लांचा मृत्यू झाला आहे. नभाच्या मृत्यूमुळे या प्रकल्पाला आणखी एक धक्का बसला आहे. तरीही, कुनोमध्ये पिल्लांचा जन्म आणि चित्त्यांचे जंगलातील चांगले प्रदर्शन यामुळे प्रकल्पाला आशेचा किरण दिसत आहे. येत्या काळात गांधी सागर वन्यजीव अभयारण्यमध्ये काही चित्त्यांना हलवण्याची योजना आहे, ज्यामुळे कुनोवरील ताण कमी होईल आणि चित्त्यांचे दीर्घकालीन संवर्धन शक्य होईल.





