T20 World Cup 2026 : ‘सूर्या आम्ही येतोय…’, युएसएच्या खेळाडूने सुर्यकुमार यादवला दिली चेतावणी
T20 World Cup 2026 : गतविजेता आणि भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आपल्या टायटल डिफेन्स मोहिमेला घरच्या मैदानावरून सुरुवात करणार आहे.

T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ ला (T20 World Cup 2026) आज सुरुवात झाली आहे. क्रिकेटच्या या छोट्या फॉरमॅटमधील महाकुंभात आज तीन सामने खेळवले जाणार आहेत, त्यापैकी सर्वात महत्त्वाचा सामना संध्याकाळी ७ वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि अमेरिका (युएसए) यांच्यात होणार आहे.
गतविजेता आणि भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आपल्या टायटल डिफेन्स मोहिमेला घरच्या मैदानावरून सुरुवात करणार आहे. टीम इंडियाची तयारी पूर्ण झाली असून, चाहत्यांमध्ये मोठा उत्साह आहे.
या सामन्यापूर्वीच (T20 World Cup 2026) युएसए चा खेळाडू हरमीत सिंग याने सूर्यकुमार यादवला एक मजेदार आणि आव्हानात्मक ‘वॉर्निंग’ दिली आहे. आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हरमीत सिंग म्हणाला, “सूर्या, मॅजिक करायला आम्ही येतोय!”. हरमीतने पुढे म्हटले, “मी काय बोललो ते सूर्याला समजेल. आम्ही दोघांनी रणजी ट्रॉफीचा डेब्यू एकत्र केला होता.
एका सिझनमध्ये आम्ही एकत्र खेळलो, पण डेब्यू करणारे आम्ही पहिले होतो. नंतर तो आमचा अंडर-१९ संघाचा कर्णधार होता.” हे दोघे जुने साथीदार असल्याने ही स्पर्धा त्यांच्यासाठी भावनिक आणि रोमांचक ठरणार आहे.
View this post on Instagram
वानखेडेवर परत येणे खास अनुभव
हरमीत सिंग हा मूळचा मुंबईचा खेळाडू आहे. त्याने सांगितले, “माझ्या आयुष्यातील पहिली २७ वर्षे मुंबईतच गेली. वानखेडेवर खेळणे नेहमीच खास राहिले आहे. मुंबईत लहानाचा मोठा झाल्यामुळे आणि इथे क्रिकेट खेळल्यामुळे, आता विश्वचषकात वानखेडेवर सामना खेळणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.”
हरमीतने युएसए संघाच्या रणनीतीबाबतही सांगितले, “टीम इंडिया एक बलाढ्य संघ आहे, पण आम्ही कोणत्याही संघाला श्रेष्ठ मानत नाही. गेल्या स्पर्धेत आम्ही ज्या प्रकारचा क्रिकेट खेळलो, तोच पुन्हा सादर करण्याची योजना आहे. आम्ही कोणत्याही संघाला ‘पेडेस्टल’वर ठेवणार नाही.”
हरमीत सिंग कोण?
हरमीत सिंग हा स्लो लेफ्ट-आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनर आणि मिडल ऑर्डर फलंदाज आहे. त्याने क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात भारतात केली होती. २०१२ च्या अंडर-१९ विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो भाग होता. घरगुती क्रिकेटमध्ये त्याने मुंबई आणि त्रिपुराचे प्रतिनिधित्व केले.
मात्र, अधिक चांगल्या संधींसाठी २०२० मध्ये तो अमेरिकेत गेला. तिथे मायनर लीग क्रिकेट (MLC) आणि मेजर लीग क्रिकेटमध्ये त्याने छाप पाडली. सिएटल थंडरबोल्ट्सचा तो कर्णधार होता आणि सिएटल ऑर्कससाठीही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
वानखेडे स्टेडियमवर आज संध्याकाळी रोमांचक सामना अपेक्षित आहे. भारताला घरच्या मैदानावर मजबूत सुरुवात हवी आहे, तर युएसएला अपसेट करण्याची संधी आहे. क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना विशेष ठरणार आहे, कारण जुने साथीदार आता एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसणार आहेत.
हे पण वाचा : T20 World Cup 2026 : टीम इंडियाला मोठा धक्का ! भारताचा हुकमी एक्का पहिल्याच सामन्यातून बाहेर






