Suryakumar Yadav : ‘मला कर्णधारपदाबाबत गिलकडून धोका…’, टी-२० कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह? सूर्यकुमार यादवचं मोठं विधान

गिलच्या कर्णधारपदाच्या चर्चेवर सूर्याची प्रतिक्रिया –
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत, शुबमन गिलकडे टी-२० संघाचे कर्णधारपद जाण्याच्या चर्चेवर सूर्यकुमार यादवने अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “यामुळे तुम्हाला उत्तम कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळते. मैदानावर आणि मैदानाबाहेरही आमच्या दोघांमध्ये उत्कृष्ट समन्वय आहे.”
गिलसोबतच्या संबंधांबद्दल बोलताना ‘स्काय’ म्हणाला, “तो कसा खेळाडू आणि माणूस आहे, हे मला माहित आहे. यामुळे मला स्वतःला चांगली कामगिरी करण्यात मदत होते. मी भीती खूप पूर्वीच सोडली आहे. मला विश्वास आहे की, मी योग्य गोष्टींचे पालन करत असेल आणि खरोखर कठोर परिश्रम करत असेल, तर सर्व काही ठीक होईल. शुबमनने खूप चांगली कामगिरी केली आहे आणि मी त्याच्यासाठी खरोखर आनंदी आहे.”
हेही वाचा – Ricky Ponting : ‘तुम्हीच प्रतिस्पर्धकांचा फायदा करून देताय!’ भारताच्या पराभवानंतर रिकी पाँटिंगचा मोठा खुलासा
‘स्काय’ची कॅप्टन्सी स्टाइल –
सूर्यकुमार यादव मोठ्या स्पर्धांच्या जवळ असूनही मैदानावर कधीही दबावात दिसत नाही, याबद्दल त्याचे कौतुक होते. आपल्या कर्णधारपदाच्या शैलीबद्दल बोलताना सूर्यकुमार म्हणाला, “मैदानात मी खूप रिलॅक्स असतो, अगदी दडपण असतानाही. क्षेत्ररक्षणादरम्यान मी हसतो.”
तो पुढे म्हणाला की, गोलंदाजांना त्यांचे मत मांडू देणे महत्त्वाचे आहे. “एका गोलंदाजाच्या मनात अनेक गोष्टी सुरू असतात. ही एक टीम आहे आणि प्रत्येकाचे मत ऐकणे आवश्यक आहे. प्रत्येकजण खूप वेगवेगळ्या कल्पना घेऊन येतो,” असे म्हणत सूर्यकुमारने सामूहिक निर्णय प्रक्रियेवर भर दिला.





