T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक २०२६ साठी २० संघ निश्चित; ‘हा’ देश खेळणार पहिल्यांदाच वर्ल्ड कप!

T20 World Cup 2026 Updates : क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेची संभाव्य सुरुवात तारीख जाहीर झाली आहे. हा क्रिकेटचा महासंग्राम ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील २० संघांची नावंही निश्चित झाली आहेत. विशेष म्हणजे, या २० संघांपैकी एक संघ प्रथमच टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहे. या संघासह इतर कोणते संघ आहेत? जाणून घेऊया.
आयपीएल २०२६ च्या आधी ही स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत खेळवली जाईल. भारतात पाच ठिकाणी सामने आयोजित केले जातील, तर श्रीलंकेत फक्त एकाच ठिकाणी सामने होण्याची शक्यता आहे, ज्याचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. आयसीसी (ICC) लवकरच या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करणार आहे.
२० संघांमध्ये रंगणार वर्ल्डकपचा थरार!
२०२६ च्या या विश्वचषकात एकूण २० संघ सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, या २० संघांपैकी एक संघ प्रथमच टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहे.
१. थेट पात्र ठरलेले संघ (यजमान आणि २०२४ कामगिरीवर आधारित): यजमान म्हणून भारत आणि श्रीलंका या संघांना थेट पात्रता मिळाली आहे. याव्यतिरिक्त, २०२४ च्या टी-२० विश्वचषकातील अव्वल सात संघ, ज्यात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांचा समावेश आहे, ते थेट पात्र ठरले आहेत.
२. रँकिंगनुसार पात्र ठरलेले संघ: टी-२० क्रमवारीच्या आधारावर न्यूझीलंड, पाकिस्तान आणि आयर्लंड या संघांनी स्थान पक्के केले आहे.
३. प्रादेशिक पात्रता फेरीतून पात्र झालेले संघ: याव्यतिरिक्त, विविध प्रादेशिक पात्रता फेऱ्यांतून कॅनडा (अमेरिका पात्रता), नेदरलँड्स, नामिबिया, झिम्बाब्वे, नेपाळ आणि ओमान हे संघ विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत.
४. २० वा आणि शेवटचा संघ: आशिया-ईएपी पात्रता फेरीतील अखेरच्या सामन्यात संयुक्त अरब अमिराती (यूएई) टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरणारा २० वा आणि शेवटचा संघ ठरला. ओमानमध्ये झालेल्या पात्रता स्पर्धेत अव्वल तीनमध्ये स्थान मिळवून यूएईने हे यश मिळवले.
‘हा’ संघ खेळणार पहिल्यांदा वर्ल्ड कप! या स्पर्धेतील सर्वात खास गोष्ट म्हणजे, इटलीचा संघ पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळणार आहे. प्रादेशिक पात्रता फेरीतून त्यांनी वर्ल्डकप खेळण्याची पात्रता मिळवून एक नवा इतिहास रचला आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेचे स्वरूप :
- गट विभागणी: २० संघांना चार गटांमध्ये विभागले जाईल (प्रत्येक गटात ५ संघ).
- सुपर ८: प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर ८ फेरीत प्रवेश करतील.
- उपांत्य फेरी: सुपर ८ मधून चार सर्वोत्तम संघ उपांत्य फेरीत जातील.
- अंतिम सामना: त्यानंतर दोन अव्वल संघ जेतेपदासाठी लढतील.





