ICC Walkover Rules : मैदानात न उतरताच भारत जिंकणार? पाकिस्तानच्या बहिष्कारावर ‘आयसीसी’चा मोठा इशारा; काय सांगतो नियम?
ICC Walkover Rules : टी-२० वर्ल्ड कपमधील वॉकओव्हरसाठी आयसीसी नियम काय आहेत? जाणून घ्या

ICC Walkover Rules for IND vs PAK Match : टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने क्रिकेट विश्वात तांत्रिक पेच निर्माण झाला आहे. १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये होणाऱ्या या सामन्यात पाकिस्तान संघ मैदानात उतरला नाही, तर भारताला एकतर्फी विजय (Walkover) कसा मिळेल आणि आयसीसी (ICC) यावर काय कारवाई करणार, याचे नियम आता समोर आले आहेत.
मैदानावर काय घडणार? ‘वॉकओव्हर’ची प्रक्रिया –
आयसीसीच्या नियमांनुसार, केवळ सोशल मीडियावरील घोषणेमुळे सामना रद्द किंवा वॉकओव्हर दिला जात नाही. त्यासाठी खालील प्रक्रिया पार पाडावी लागेल.
- नाणेफेकीची वेळ: सामन्याच्या दिवशी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला नियोजित वेळेत नाणेफेकीसाठी (Toss) मैदानात उपस्थित राहावे लागेल.
- पाकिस्तानची अनुपस्थिती: जर पाकिस्तानचा कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात आला नाही, तर सामना पंच (Match Referees) अधिकृतपणे पाकिस्तानने सामना गमावल्याचे (Forfeit) घोषित करतील.
- भारताला २ गुण: सामना पंचांनी निर्णय दिल्यानंतर, एकही चेंडू न टाकता भारताला विजयी घोषित केले जाईल आणि गुणतालिकेत मोलाचे २ गुण दिले जातील.
India vs Pakistan at the T20 World Cup tells a story of its own. 🇮🇳🇵🇰 What do you make of Pakistan boycotting the IND vs PAK clash in 2026? 🤔 #INDvsPAK #T20WorldCup 🏟️💥🔥 pic.twitter.com/V20UsgXUYn
— Last Over Drama (@LastOverDrama) February 2, 2026
पाकिस्तानला बसणार दुहेरी फटका –
वॉकओव्हरचा पाकिस्तानला दुहेरी फटका
भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकणे पाकिस्तानला महागात पडू शकते. भारताविरुद्धचे २ गुण गमावल्यामुळे त्यांना गटातील इतर सामने (नेदरलँड्स, अमेरिका आणि नामिबिया) जिंकणे अनिवार्य असेल. यापैकी एकही सामना गमावल्यास पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात येऊ शकते. तसेच, सामना न खेळल्यामुळे त्यांच्या नेट रनरेटवरही (NRR) विपरीत परिणाम होईल.
आयसीसीची संतप्त प्रतिक्रिया; पीसीबीला दिला इशारा
आयसीसीने पाकिस्तान सरकारच्या भूमिकेची गंभीर दखल घेतली आहे. आयसीसीने स्पष्ट केले की:
- खेळभावनेला तडा: एका विशिष्ट संघाविरुद्ध सोयीस्करपणे बहिष्कार टाकणे हे क्रिकेटच्या मूळ भावनेच्या विरोधात आहे.
- अधिकृत पत्राची प्रतीक्षा: आयसीसीला अजूनही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (PCB) अधिकृत पत्राची प्रतीक्षा आहे.
- दूरगामी परिणाम: अशा प्रकारच्या वागणुकीमुळे भविष्यात पाकिस्तानवर कडक कारवाई किंवा बंदी येण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असा सूचक इशारा आयसीसीने दिला आहे.





