T20 World Cup 2024 : भारताचे विश्वविजेतेपद निश्चित! ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाने केली मोठी भविष्यवाणी…

T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ अमेरिकेत दाखल झाला आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा 1 जूनपासून सुरू होत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 5 जून रोजी आयर्लंडविरुद्धच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात करणार आहे. यानंतर 9 जूनला भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येतील. आयर्लंड आणि पाकिस्तानशिवाय टीम इंडिया अमेरिका आणि कॅनडाविरुद्ध खेळणार आहे. मात्र, ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल क्लार्कने आपले मत मांडले आहे.
खरे तर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला रोखणे सोपे नाही, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल क्लार्कने व्यक्त केले आहे. स्पर्धेतील विरोधी संघांसाठी भारत मोठ्या अडचणीचे कारण बनणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा जिंकणाऱ्या संघांमध्ये भारत माझा फेव्हरेट संघ आहे. मायकेल क्लार्क म्हणाला की, टीम इंडियाची फलंदाजीसह गोलंदाजीही मजबूत आहे. या संघाला रोखणे सोपे जाणार नाही. माझा विश्वास आहे की, भारतीय संघ हा इतराचाही टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी फेव्हरेट असेल.
दरम्यान, टी-20 विश्वचषक 2007 मध्ये सुरु झाला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-20 विश्वचषकाची पहिली आवृत्ती जिंकली. पण त्यानंतर जवळपास 17 वर्षे उलटून गेली, पण टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यात यश आलेले नाही.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 17 वर्षांचा दुष्काळ संपवू शकणार का? भारताला पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडासह अ गटात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे टीम इंडिया या संघांसोबत खेळणार आहे. भारतीय संघ आपले पहिले तीन सामने न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर खेळणार आहे.





