T20 World Cup 2024 : आयर्लंडकडून पराभूत झाल्यानंतर रमीझ राजा पाक संघावर संतापला, म्हणाला “वर्ल्ड कपमध्ये USA सुध्दा…”

T20 World Cup 2024 : गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानी क्रिकेट संघात बदल झाला आहे. बाबर आझम पुन्हा कर्णधार बनला आहे, गॅरी कर्स्टनला मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये संघाचे प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. याशिवाय पाकिस्तानी खेळाडूही अनोख्या पद्धतीने फिटनेस ट्रेनिंग करताना दिसले, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण आता दिग्गज क्रिकेटर आणि पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघाच्या तयारीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
नुकताच तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात आयर्लंडने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. यासह आयर्लंडने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये आयर्लंडचा पाकिस्तानवर पहिला विजय आहे. आयर्लंडने 2007 नंतर प्रथमच पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्यानंतर आता आता रमीझ राजाने पाकिस्तानी संघाच्या कामगिरीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) माजी अध्यक्ष म्हणाले, “संघाचे संयोजन बरोबर नसताना पाकिस्तान विश्वचषक कसा जिंकेल. सलामीच्या जोडीचा काही ताळ-मेळ नाही, सेट झालेले फलंदाज निष्काळजीपणे विकेट गमावत आहेत आणि मधल्या फळीची कामगिरी चांगली नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार पाकिस्तान उपांत्य फेरीत कसा पोहोचेल…? असा प्रश्न त्याने उपस्थित केला. तसेच यूएसए संघही आमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतो कारण त्यांच्याकडे भारतीय आणि पाकिस्तानी वंशाचे अनेक खेळाडू आहेत” असं मत देखील माजी खेळाडूनं व्यक्त केलं आहे.
IRE vs PAK 1st T20 : बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची अवस्था बिकट; आयर्लंडकडून प्रथमच पाकचा पराभव…
बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची अवस्था बिकट…
याशिवाय रमीझ राजा म्हणाला की, ” पाकिस्तान संघ आयर्लंडविरुद्धच्या धावसंख्येचा बचाव करू शकला नाही. कर्णधार बदलापूर्वी संघाची कामगिरी चांगली होती. विश्वचषकाच्या वर्षात संघाची टी-20 क्रमवारी सातवर गेली आहे. हे पाकिस्तानी संघाची खरी स्थिती सांगत आहे.” असं देखील रमीझ याने म्हटले आहे.
दरम्यान, पाकिस्तान संघाने 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 2 टी-20 मालिका खेळली आहे, ज्यामध्ये त्यांना एकदा 4-1 ने पराभवाचा सामना करावा लागला होता आणि दुसरी मालिका 2-2 अशी बरोबरीत होती. यावरून सध्या पाकिस्तान संघाची अवस्था अतिशय बिकट दिसत आहे.
भारत आणि पाकिस्तान एकाच गटात
T20 विश्वचषक 2024 हा 1 जूनपासून सुरू होणार आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्यात आले आहे. अ गटात समाविष्ट असलेला भारत 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. दुसरीकडे, पाकिस्तान आपल्या मोहिमेची सुरुवात 6 जून रोजी अमेरिकेविरुद्धच्या सामन्याने करेल. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 9 जून रोजी होणार आहे.





