नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम, उद्या निर्णय

मुंबई – शिवसेना कार्यकर्ता संतोष परब जीवघेणा हल्लाप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार अजूनही कायम आहे. या प्रकरणी सत्र न्यायालयात आजच्या सुनावणीत दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आता न्यायालय यावर उद्या, मंगळवारी निकाल देणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार वादात अडकले आहेत. यावेळी सरकारी वकील म्हणून प्रदीप घरत यांनी युक्तीवाद केला. तर संतोष परब यांच्याकडून ऍड. विलास पाटील-शिरगावकर आणि नितेश राणे यांच्यातर्फे ऍड. सतीश मानशिंदे यांनी युक्तिवाद केला. ही सुनावणी आर. बी. रोटे यांच्या न्यायालयात पार पडली.
प्रदीप घरत यांनी युक्तीवाद करताना म्हणाले, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार नितेश राणे यांनी पहिल्यांदा जिल्हा सत्र न्यायालयाला शरण यावे आणि मग नियमित जामिनासाठी अर्ज करावा. ही अट त्यांच्याकडून पाळली गेली का? तसेच हा हल्ला सुपारी देऊन करण्यात आलेला आहे. कारण आरोपींमधील कोणीही संतोष परब यांना ओळखत नाही. त्यामुळे ते हल्ला का करतील? त्यामुळे या प्रकरणाच्या योग्य तपासासाठी काही दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक आहे.
दुसरीकडे संतोष परब यांचे वकील विलास पाटील-शिरगावकर यांनीही पोलीस कोठडीची मागणी केली. ते म्हणाले, न्यायालयाला शरण आलेल्या आरोपीला पोलीस कस्टडी व्हायला पाहिजे. नितेश राणे यांच्यातर्फे वकील सतीश मानशिंदे यांनी युक्तिवाद केला. दरम्यान या सर्व युक्तीवादानंतर आजचा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला असून उद्या दुपारी 3 वाजता निर्णय सुनावणार आहे.





