Swine Flu: ‘स्वाईन फ्लू’चे कमबॅक; १९ रुग्णांची नोंद – वैद्यकीय विभाग अलर्टवर
Swine Flu: शहराचे आरोग्य बिघडले : थंडी तापाचे तीस हजार रुग्ण; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पिंपरी – शहरात थंडी-तापाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असून साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. असे असतानाच आता स्वाईन फ्लूने देखील शहरातील नागरिकांना घेरले असून ऑगस्ट महिन्यामध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागाचा ताप वाढला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वातावरणातील बदलामुळे सध्या तापाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. त्यासोबतच स्वाईन फ्लूच्या रुग्णांची देखील वाढ होऊ लागली आहे. शहरामध्ये २०२२ साली स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत होते. त्यावेळी कोविडचा प्रादुर्भाव कमी झाला होता. त्यानंतर सन २०२३ ते आतापर्यंत तीन वर्षामध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद झाली नसल्याचे वैद्यकीय विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
मात्र या वर्षी पावसाळ्यात स्वाईन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत १९ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली आहे. मात्र, त्यातील सुमारे १६ रुग्णांची नोंद एकट्या ऑगस्ट महिन्यातील १५ दिवसांमध्ये झाली आहे. त्यामुळे स्वाईन फ्लू झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे.
स्वाईन फ्लू हा श्वसनसंस्थेशी संबंधित आजार असून सर्दी, खोकला, घसादुखी, ताप आदी लक्षणे आढळतात. वातावरणातील बदलाच्या पार्श्वभूमीवर ताप किंवा श्वसनाशी संबंधित लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष न करता जवळच्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दवाखाना किंवा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. वेळेत वैद्यकीय तपासणी व योग्य उपचार घेतल्यास आजाराचे योग्य व्यवस्थापन करणे शक्य होते.
स्वाईन फ्लूच्या प्रतिबंधासाठी वैयक्तिक स्वच्छता राखणे आणि गर्दीच्या ठिकाणी अनावश्यक जाणे टाळणे महत्त्वाचे आहे. नियमितपणे हात धुणे, पुरेशी विश्रांती घेणे, पौष्टिक आहार घेणे आणि शरीर हायड्रेटेड ठेवणे यामुळे आरोग्याची काळजी घेण्यास मदत होते. तसेच नागरिकांनी स्वतःहून औषधोपचार न करता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसारच औषधांचा वापर करावा.
विशेषतः ताप, सर्दी, खोकला किंवा घसादुखी यांसारखी लक्षणे जाणवत असल्यास लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने जवळच्या महापालिका दवाखाना किंवा रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.
डेंग्यूचाही ताप वाढला
शहरामध्ये पावसाळा सुरू झाल्यापासून थंडी-तापांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जुलै महिन्यामध्ये ५८० डेंग्यूचे संशयित आढळले होते. तर १३ जणांना डेंग्यू झाला होता. ऑगस्ट महिन्यात यामध्ये वाढ झाली असून ६२४ संशयित रुग्णांपैकी २५ जणांचा डेंग्यू तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
याशिवाय ऑगस्ट महिन्यामध्ये ३० हजारांहून अधिक रुग्णांना तीव्र थंडी ताप आहे. तीन जणांना मलेरिया तर दोघाना चिकनगुनियाची लागण झाली आहे. साथीचे हे आजार वाढलेले असताना आता त्यामध्ये स्वाईन फ्लूची देखील भर पडली आहे.
नागरिकांनी ही काळजी घ्यावी
- स्वाईन फ्लूच्या विषाणूबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
- लक्षणे आढळल्यास तातडीने नजीकच्या महापालिका दवाखाना किंवा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा.
- वारंवार साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुवावेत.
- पोषक व संतुलित आहार घ्यावा.
- धूम्रपान टाळावे.
- पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी.
- शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी भरपूर पाणी प्यावे.
- आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री तसेच हिरव्या पालेभाज्यांसारख्या आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करावा.
- गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे.
- आवश्यकता भासल्यास मास्कचा वापर करावा.
- खोकताना किंवा शिंकताना नाक व तोंड रुमालाने अथवा टिश्यूने झाकावे आणि त्यानंतर हातांची स्वच्छता राखावी.
‘नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लू आजारासाठी आवश्यक औषधोपचार उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी आजाराच्या लक्षणांबाबत घाबरून न जाता वेळेत वैद्यकीय तपासणी करून घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत.’ – डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.
BARTI student: बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण सुरू





