Pune : परिचारिकांच्या राज्यव्यापी संपामुळे रुग्णांची गैरसोय

पुणे – सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ राज्य परिचारिका संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील आरोग्यसेवा विस्कळीत झाली असून, रुग्ण, नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे.
राज्यात जवळपास ३५ हजार परिचारिका असून, ससून रूग्णालयात सहाशे ते सातशे परिचारिका आहेत. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या संपात शहर आणि जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिका संपात सहभागी झाल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.
या संपामुळे प्रशासनाची धांदल उडाली असून, ससून रूग्णालयात निवासी डाॅक्टरांसह वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. संपामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनाची धावपळ होत असून, मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या आहेत मागण्या
वेतनातील त्रुटींचे निवारण, परिचारिकांना केंद्राप्रमाणे नर्सिंग, गणवेश भत्ता द्यावा, पात्र परिचारिकांना शैक्षणिक भत्ते द्यावे, पदनामात बदल करावा, कंत्राटी भरती परिपत्रकातून परिचारिकांना वगळावे, परिचारिका संवर्गाच्या स्वतंत्र संचालनालयाची स्थापना करा, सेवा प्रवेश नियमातील त्रुटी दूर करा.





