Pune : डासांचा डंख वाढतोय; डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येने खबरदारीचे पालिकेचे आवाहन

पुणे – शहरातील डेंग्यूचे रूग्ण वाढत असून, डासांचा वाढता डंख पुणेकरांच्या आरोग्याची डोकेदुखी वाढवत आहे. गेल्या पाच महिन्यांत जेवढे डेंग्यू रूग्णसंख्या नोंदवली, तेवढी संख्या एकट्या जूनमध्ये नोंदवली. यामुळे नागरिकांनी डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करावी, स्वच्छता पाळावी असे आवाहन पालिकेने केले आहे.
पावसाळा सुरू होताच साथीचे आजार डोके वर काढतात. सर्दी, खोकला, ताप, घसा आदी आजारांनी नागरिक हैराण होतात. त्यातच डेंग्युच्या डासांची पैदासही वाढते. पावसामुळे सोसायटी, गोडाऊन, पडकी घरांसह अन्यत्र पाणी साचून डासांची पैदास वाढू लागते. एडिस इजिप्ती या डासांपासून डेंग्यू होण्याची भीती अधिक असते.
जानेवारी २०२५ मध्ये पालिका कार्यक्षेत्रात डेंग्युचे ३९ रूग्ण आढळले. फेब्रुवारीत ३१ रूग्ण सापडले. त्यानंतर पुढील तीन महिने उन्हाळ्यामुळे रूग्णसंख्या काहीशी घटली. यंदा मे महिन्यातच पावसाने हजेरी लावली आणि जून महिन्यात डेंग्यू रूग्णांची संख्या १२३ वर पोहचली.
जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ११ नवीन डेंग्यूचे रूग्ण सापडले. गेल्या आठवड्यात चिकनगुनिय़ाचे दोन संशयीत रूग्ण सापडले. त्यामुळे लक्षणे दिसताच तात्काळ डाॅक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे, असे आवाहन पालिका सहाय्यक आरोग्य प्रमुख डाॅ. राजेश दिघे यांनी केले आहे.
गेल्या सहा महिन्यांतील डेंग्यूची संख्या
जानेवारी – ३९, फेब्रुवारी – ३१, मार्च १८, एप्रिल – १९, मे – २३, जून – १२३, जुलै (दि. ४) ११
डेंग्युची लक्षणे
– थंडी वाजून ताप येणे
– डोकेदुखी, अंगदुखी, हाडे, सांध्यांत वेदना
– मळमळ, अंगावर सूज, चट्टे येणं
– सतत तहान लागणे, अशक्तपणा
– डास चावल्यावर ४ ते १० दिवसात लक्षणे दिसतात
काय काळजी घ्यावी
– एसी, फ्रीजखाली साचलेलं पाणी, फुलदाण्या, कूलर, कुंड्या, बादल्या, जुने टायरमध्ये पाणी साचू देऊ नका
– पाण्याचे टाके, ड्रम, इतर पाण्याच्या साठ्यांवर झाकण ठेवा
– शरीर पूर्ण झाकणारे कपडे वापरा
-डास प्रतिबंधक क्रीम, स्प्रे वापरा
– डासनाशक फवारणी वापरा
– खिडक्या, दारे बंद ठेवा
– झोपताना मच्छरदाणी वापरा.





