पुणे : तलाव दुरुस्तीसाठी गंटागळ्या; 18 ठिकाणची जलतरण सुविधा बंदच

पुणे- नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने सुमारे 34 जलतरण तलाव उभारले आहेत. मात्र, त्यातील 18 तलाव देखभाल-दुरुस्तीअभावी बंद आहेत. या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी तसेच निविदा प्रक्रियेमुळे होणारा उशीर यामुळे हे तलाव बंद पडले आहेत. त्यामुळे महापालिकेने आतापर्यंत केलेला लाखोंचा खर्च पाण्यात गेला आहे.
महापालिकेच्या दोन तलावांबाबत न्यायालयीन वाद सुरू आहेत. त्यामुळे शहरात सध्या केवळ 16 तलावच सुरू आहेत. 16 मधील 8 तलावांच्या ठेकेदारांनी सुमारे 3 कोटी 86 लाख रुपये थकवले असून, त्यांचे तलाव पालिकेने सील केले आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मोजके तलाव पुणेकरांच्या सेवेत आहेत.
तर, नगरसेवकांच्या आग्रहाताखतर उभारण्यात आलेल्या या तलावांच्या देखभाल दुरुस्तीवर वारंवार खर्च करूनही ही स्थिती उद्भवत आहे. त्यामुळे हे तलाव महापालिकेसाठी पांढरे हत्ती ठरत आहेत. दरम्यान, “यातील चार तलाव मार्चअखेर ताब्यात आले आहेत. त्यांच्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे,’ अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
दुरुस्तीसाठी दीड कोटींचा खर्च?
देखभाल-दुरुस्तीअभावी हे तलाव बंद आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी जवळपास दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे तलाव दोन वर्षांपूर्वी मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या ताब्यात होते. करोना काळानंतर हे तलाव क्रीडा विभागांकडे हस्तांतरित करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात त्याची दुरुस्ती भवन विभागाकडून केली जाते. मात्र, भवन विभाग त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे कोट्यवधींचे उत्पन्न देणारे जलतरण तलाव बंद ठेवण्याची वेळ आली आहे.





