श्रद्धा, इतिहास आणि वास्तुकलेचं वैभव; भारताच्या प्राचीन मंदिरांचा आध्यात्मिक प्रवास…
suvarna mandir | badrinath temple | kedarnath | varanasi | vaishno devi : भारताला धार्मिक आणि सांस्कृतिकतेचा संपन्न वारसा लाभलेला आहे. देशात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. अनेक मंदिरांचे वास्तुआरेखन आणि सौंदर्य अचंबित करणारे आहे. या मंदिरांचे भव्य रुप पाहून आश्चर्यचकीत व्हायला होते. अशा मंदिरांविषयी आज आपण बोलणार आहोत, आणि त्यांची खास माहिती देखील पाहुयात…
१) काशी विश्वनाथ, वाराणसी (उत्तर प्रदेश) –
काशी विश्वनाथ या नावाने ओळखले जाणारे हे महादेवाचे मंदिर आहे. हिंदूच्या पवित्र मंदिरांपैकी एक अशी याची ओळख आहे. वाराणसीत गंगेच्या किनाऱ्यावर हे मंदिर आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक अशी ख्याती असलेले हे मंदिर ११ व्या शतकात बांधण्यात आले असावे असा अंदाज आहे. आता या मंदिराचे पुननिर्माण करण्यात आले असून भाविकांसाठी अनेक सोयीसुविधांची निर्मिती करण्यात आलेली आहे. या मंदिराचा सुवर्णमुकुट महाराजा रणजितसिंग यांनी दान दिलेला आहे. या मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात.
२) केदारनाथ (उत्तराखंड) –
गढवाल हिमालयात ३५८३ मीटर उंचीवर हे मंदिर आहे. हे मंदिर पांडवांनी बांधले आणि नंतर ८ व्या शतकात आदि शंकराचार्यांनी त्याचे पुनर्निर्माण केले. चारधाम यात्रेतील हे एक मंदिर आहे. दगडी बांधकाम असलेले हे मंदिर हिमालयातील थंडी, वादळे, पुरातही टिकून राहिलेले आहे.
३) बद्रीनाथ मंदिर (उत्तराखंड) –
हे ठिकाण चमोली जिल्ह्यात आहे आणि इथे भगवान विष्णुचे मंदिर आहे. हे मंदिरही चारधाम यात्रेत येते. या मंदिराची स्थापना आदि शंकराचार्यांनी नवव्या शतकात केली आहे. याठिकाणी असलेली बद्रीनारायणाची काळ्या पाषाणातील मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. हिमशिखरांनी वेढलेल्या डोंगररांगात हे मंदिर विसावले आहे.
४) सुवर्ण मंदीर (हरमंदीर साहिब), पंजाब –
शीख धर्मियांसाठी पवित्र असणाऱ्या या मंदिराची उभारणी १६ व्या शतकात करण्यात आली आहे. पवित्र तलावाच्या ठिकाणी असणाऱ्या या मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी शीख धर्मियांकडून रोज लंगर चालवले जाते. त्याठिकाणी हजारो भाविक प्रसाद ग्रहण करतात.
५) वैष्णोदेवी मंदिर (जम्मू-काश्मीर) –
माता वैष्णोदेवीचे हे मंदिर कटरा जिल्ह्यात असून ते हिंदू धर्मियांसाठी पवित्र मानले जाते. गुहेत असणारे हे मंदिर सुमारे एक हजार वर्षे जुने असावे असा अंदाज बांधला जातो. या मंदिरापर्यंत पोचण्यासाठी सुमारे १२ किलोमीटरचा प्रवास चालत किंवा हेलिकॉप्टरने करावा लागतो.










