जयंत पाटलांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स कायम; जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘ही बातमी खोडसाळ’

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची बातमी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही बातमी खोडसाळ असल्याचे सांगत राजीनाम्याच्या वृत्ताला पूर्णविराम दिला आहे. यामुळे पक्षातील प्रदेशाध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम आहे.
शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती होणार असून, १५ जुलै रोजी मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत याबाबत अधिकृत घोषणा होईल, असेही सांगितले जात आहे. मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी या वृत्ताला स्पष्टपणे नकार दिला आहे. “जयंत पाटील साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या खोडसाळ आहेत. पक्ष एका शिस्तीनुसार चालतो आणि निर्णय बैठकीतच घेतले जातात,” असे आव्हाड यांनी सांगितले. तसेच, “शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याचे मला तुमच्याकडूनच कळत आहे. पवार साहेब सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतात,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
मा. जयंत पाटील साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारीत होणे , हा निव्वळ खोडसाळपणा आहे. पक्ष एका नियमानुसार अन् शिस्तीनुसारच चालत असतो.@PawarSpeaks @supriya_sule @Jayant_R_Patil
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 12, 2025
दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनी राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा देत, “जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे. १५ जुलै रोजी नवीन प्रदेशाध्यक्षाची घोषणा होईल आणि ती जयंत पाटीलच करतील,” असे म्हटले आहे. यामुळे पक्षात अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा रंगली आहे.
शशिकांत शिंदे यांनीही याबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे. “प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजून नाव निश्चित नाही. पवार साहेब, सुप्रिया ताई आणि जयंत पाटील यांचा जो निर्णय असेल, तो मान्य असेल. १५ जुलैच्या बैठकीत सर्व काही स्पष्ट होईल,” असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेल्या काही महिन्यांपासून नेतृत्वबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. जयंत पाटील यांनी सात वर्षे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने अनेक निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केली. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला केवळ १० जागांवर समाधान मानावे लागले. यानंतर पक्षात नव्या नेतृत्वाला संधी देण्याची मागणी जोर धरू लागली होती.
जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या बातमीने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आता १५ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





