Jitendra Awhad: महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकावर सोमवारी विधानसभेत वादळी चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधेयक सभागृहात समजावून सांगितल्यानंतर विरोधकांनी आपली भूमिका मांडली. ठाकरेंच्या शिवसेनेने विधेयकास पाठिंबा दिला, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विरोध नोंदवला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधेयकाला कडाडून विरोध केला. मात्र चर्चेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून सभागृहात मोठा गोंधळ उडाला आणि अखेर अध्यक्षांच्या निर्देशानुसार आव्हाड यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. आव्हाडांचा विरोध — काय म्हणाले? जितेंद्र आव्हाड यांनी विधेयकाच्या नावावरच आक्षेप घेतला. “‘धर्म स्वातंत्र्य’ या नावाने विधेयक आणणे म्हणजे संविधानाला छेद देणे आहे. हे विधेयक धर्म स्वातंत्र्याचे नव्हे तर धर्म नियंत्रणाचे आहे,” असे ते म्हणाले. गौतम बुद्ध, जैन धर्मसंस्थापक आणि बसवेश्वर यांनीही धर्मांतर केले होते. हे विधेयक त्या काळात असते तर त्यांनाही तुरुंगात जावे लागले असते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “एक मुलगा आणि मुलगी यांनी संवैधानिक पद्धतीने विवाह केला तर तुम्ही त्यांना मारझोड करणार आहात का? धर्मांतरासाठी नोटीस कशाला द्यायची?” असेही आव्हाड यांनी विचारले. वर्णव्यवस्थेवरही केले भाष्य – आव्हाड यांनी वर्णव्यवस्थेवरही परखड भाष्य केले. “मी हिंदू आहे, पण मी ज्या सोसायटीत राहत होतो तिथे माझ्या आईला शेवटपर्यंत पूजेसाठी बोलावले जात नव्हते. सावित्रीबाईंवर शेण फेकले — हे धर्म स्वातंत्र्य आहे का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वर्गात बसू दिले जात नव्हते, त्यांनी आज संविधान लिहिले,” असे ते म्हणाले. “धर्माला विरोध करून कोणी धर्मांतर करत असेल तर ते हिंदू धर्मातील सर्वात मोठे एक्सेप्शन आहे,” असेही त्यांनी नमूद केले. हेही वाचा – धर्मांतर बंदी विधेयकावरून ओवैसी-आझमी संतापले; फडणवीसांनी दिले खरमरीत प्रत्युत्तर ‘माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली’ जातीच्या भिंती तोडायच्या असतील तर मुलगी दुसऱ्या धर्मात द्यायला हरकत नाही, असे सांगत आव्हाड यांनी स्वतःच्या मुलीच्या लग्नाचा दाखला दिला. “माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली. काही मिशनऱ्यांचे रस्त्यावरच्या मुलांना शाळेत आणण्याचे योगदान आहे,” असे ते म्हणाले. “धर्मांतराला आमचा विरोध नाही, मात्र या विधेयकाच्या नावाला आणि हेतूला आमचा विरोध आहे. संविधानाच्या मूळ गाभ्याला हात घालता येत नाही,” असेही आव्हाड यांनी सांगितले. शिवरायांच्या उल्लेखावरून गोंधळ – आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे एक उदाहरण दिले. मात्र त्यांनी वापरलेल्या शब्दांवर सत्ताधारी पक्षातील आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला. मंत्री शंभुराज देसाई आणि आमदार योगेश सागर यांनी आव्हाडांनी माफी मागावी, अशी मागणी केली. भाजप आमदार थेट वेलमध्ये उतरले आणि सभागृहात मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे अध्यक्षांनी सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब केली. अध्यक्षांच्या निर्देशानुसार माफी – अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले, “हे देशाचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्यासंदर्भात असे वक्तव्य ठीक नाही. देशात याचे पडसाद उमटू शकतात. आपण दिलगिरी व्यक्त करा, असे निर्देश मी देतो.” त्यावर आव्हाड म्हणाले, “कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो.” अध्यक्षांनी ते वक्तव्य पटलावरून काढून टाकल्याचेही जाहीर केले.