Jitendra Awhad : मुंब्र्यात ‘कैसा हराया’ या वाक्याने सोशल मीडियावर गाजलेल्या एमआयएमच्या तरुण नगरसेविका सहर शेख यांच्या वक्तव्यावर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर सभेत प्रतिक्रिया दिली. मात्र ही प्रतिक्रिया आक्रमक न होता उपरोधिक आणि शांत भाषेत होती. एखाद्या मुलीने काही म्हटलं तर रागाने पाहू नका, ती आपलीच मुलगी आहे. उमेदवारी ४० जणांनी मागितली होती, पण मला चौघांनाच देता येते, असे म्हणत आव्हाड यांनी या वादाला फारसे महत्त्व दिले नाही. जग प्रेमाने जिंकता येते, यावर माझा ठाम विश्वास आहे. मार्जिया मुंब्र्यात चांगले काम करत आहे. सहर शेख हसत ‘चॉकलेट लाया’ असं म्हणाली असती, तरी तेवढंच गाजलं असतं, असे म्हणत त्यांनी ‘कैसा हराया’ या विधानावर अप्रत्यक्ष टोला लगावला. ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्र्यातून आव्हाड यांनी सहर शेख यांचे तिकीट कापले होते. त्यानंतर सहर शेख यांनी एमआयएमकडून निवडणूक लढवत विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर त्यांच्या ‘कैसा हराया’ या वक्तव्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. त्यांच्या वडिलांनीही आव्हाड यांच्यावर तीव्र टीका केली होती. Sahar Shaikh मंगळवारी मुंब्र्यातील कौसा भागातील दहा नगरसेवकांनी आव्हाड यांचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी त्यांनी मुंब्रा शहराचा गांधीवादी वारसा अधोरेखित करत इथे लढाईची भाषा शोभत नाही. माझी लढाई ही विचारधारेची आहे, असे स्पष्ट केले. धमक्यांच्या संदर्भात बोलताना त्यांनी, मी घाबरत नाही. आव्हान दिलं तरी मी समोर जाईन, असा ठाम इशाराही यावेळी बोलताना दिला.