Ashok Kharat : मुख्यमंत्र्यांना हटवण्यासाठी कटकारस्थान? ३८ आमदारांनी खरातकडे बोटं कापली, आव्हाडांच्या दाव्याने खळबळ
Ashok Kharat : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अशोक खरात प्रकरणात मोठी गुपिते उघड केली आहेत.

Ashok Kharat : देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावरुन दूर करण्यासाठी काही आमदारांनी भोंदूबाबा अशोक खरातकडे जाऊन अघोरी पूजेचा घाट घातला होता, असा धक्कादायक दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. खरातनेही या संबंधित नेत्यांना फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करु, असे आश्वासन दिल्याचा दावा त्यांनी केला. आव्हाड हे विधानसभेत चर्चेवेळी बोलत होते.
आव्हाड म्हणाले, मी खात्रीने सांगतो खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्यासाठी काहीजण प्रयत्न करत होते. हे सर्वजण खरातकडे पूजा घालायला गेले होते. वेळ आल्यावर मी त्यांचे नावे उघड करेन. ही सगळी माहिती सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांना मिळाली होती.
या नेत्यांच्या खरातसोबत बैठका झाल्या होत्या. तेव्हा, मला थोडे दिवस द्या, मुख्यमंत्री घरी गेलेले असतील, असा खरात म्हणाला होता. मला एका गोष्टीचे वाईट वाटत आहे की, या संत तुकारामांच्या, ज्ञानेश्वरांच्या, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण काळ्या जादूला इतकी मान्यता देतोय.
राजकारणात काळ्या जादूने काहीही होऊ शकते, असे आमदारांना वाटू लागले आहे. माझ्याकडे 38 आमदारांची लिस्ट आहे, ज्यांनी खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्या होत्या. परवा विधानभवनात सगळे आमदार एकमेकांची बोटे तपासून पाहत होते, तू खरातकडे जाऊन आलास का, विचारत होते.
ही परिस्थिती महाराष्ट्रात आहे. या बाबासाठी सरकाराचा पैसा जात आहे. रस्ते बनवले जात आहेत. शिक्षण खाते, म्हाडा, एसआरए सगळ्या पोस्टिंग खरातकडून केल्या जात आहेत. या खरातच्या ट्रस्टच्या सदस्यांना अजून अटक का झाली नाही?, असा प्रश्नही आव्हाड यांनी केला.





