Sushila Karki : पंतप्रधान होताच सुशीला कार्की यांचा मोठा निर्णय

काठमांडू : नेपाळचे अध्यक्ष रामचंद्र पौडेल यांनी संसदेचे प्रतिनिधीगृह विसर्जित केले आहे. काल रात्री हंगामी पंतप्रधान म्हणून नियुक्त झालेल्या सुशिला कार्की यांच्या शिफारसीनंतर हा निर्णय घेण्यात आला. शपथविधी झाल्यानंतर कार्की यांनी लगेच आपल्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावून संसदेचे प्रतिनिधीगृह विसर्जित करण्याची शिफारस अध्यक्षांकडे केली.
त्यानुसार रात्री ११ वाजण्याच्या सुमारास संसदेचे प्रतिनिधीगृह विसर्जित करण्यात आले असल्याचे अध्यक्षांच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अध्यक्ष रामचंद्र पौडेल यांनी नव्या निवडणुकांची तारीख देखील जाहीर केली आहे. दिनांक २१ मार्च २०२६ रोजी संसदेच्या निवडणुका घेण्यात येतील, असे या निवेदनामध्ये म्हटले आहे.
नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी सरन्यायाधीश सुशिला कार्की यांचा काल रात्री हंगामी पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला. त्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी त्यामुळे समाप्त झाली.
रात्री झाला शपथविधी
अध्यक्ष रामचंद्र पौडेल यांनी रात्री ९ वाजता नेपाळच्या राज्यघटनेच्या कलम ८० नुसार सुशीला कार्की यांना हंगामी पंतप्रधान म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. अध्यक्षांच्या कार्यालयात हा शपथविधी झाला. हंगामी पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. देशाला वाचवण्याची जबाबदारी आता तुमच्यावर आहे, असे अध्यक्ष पौडेल यांनी सुशिला कार्की यांना उद्देशून सांगितले. या शपथविधीच्या कार्यक्रमाला नेपाळचे सरन्यायाधीश, वरिष्ठ सरकारी अधिकारी, सुरक्षा प्रमुख आणि उच्चस्तरिय समुदायाचे सदस्य उपस्थित होते. माजी पंतप्रधानांपैकी केळ बाबूराय भट्टाराय हे यावेळी उपस्थित होते.
शपथविधीनंतर आंदोलनकर्त्या जेन-झी गटाच्या युवकांनी काठमांडूतील महाराजगंज भागातल्या शीतलनिवास या अध्यक्षीय कार्यालयाबाहेर आनंदोत्सव केला.
हे माझे घर आहे
हे माझे घर आहे. माझे कॉलेज आहे. आता हा माझा देश आहे. प्रेम, त्याग आणि आणि मातेच्या स्नेहाने मी काम करेन, असे नूतन पंतप्रधान सुशीला कार्की यांनी फेसबुकवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. अध्यक्ष रामचंद्र पौडेल, लष्करी अधिकारी आणि युवा आंदोलनकांबरोबरच्या बैठकीमध्ये त्यांची पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. अध्यक्ष पौडेल यांनी घटनातज्ज्ञांबरोबर आणि सिव्हील सोसायटीच्या नेत्यांबरोबर देखील विचार विनिमय केल्यानंतर कार्की यांच्या नियुक्तीला मान्यता दिली.





