Nepal PM: सुशीला कार्की यांनी नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान म्हणून घेतली शपथ, देशाचे नेतृत्व करणाऱ्या ठरल्या पहिल्या महिला

काठमांडू: नेपाळच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांनी अंतरिम पंतप्रधान म्हणून शपथ घेतली असून, त्या देशाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी त्यांना शपथ दिली. राष्ट्रपतींच्या प्रवक्त्या किरण पोखरेल यांनी कार्की यांच्या नियुक्तीची घोषणा केली. यासोबतच नेपाळची संसदही बरखास्त करण्यात आली आहे. सुशीला कार्की यांच्यासमोर सध्या देशाला गंभीर परिस्थितीतून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान आहे.
Gen Z आंदोलकांचा दबाव, हिंसक निदर्शनांमुळे बदलली सत्ता –
Gen Z आंदोलकांनी अंतरिम सरकारच्या नेतृत्वासाठी सुशीला कार्की यांच्यासह काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह आणि वीज मंडळाचे माजी सीईओ कुलमन घीसिंग यांची नावे सुचवली होती. यासंदर्भात राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्याशी त्यांची सातत्याने चर्चा सुरू होती. राष्ट्रपतींनी आंदोलकांना देशात शांतता आणि सुरक्षा राखण्याचे आवाहन केले होते.
#WATCH | Kathmandu | Nepal’s former Chief Justice, Sushila Karki, takes oath as interim PM
Oath administered by President Ramchandra Paudel
No ministers inducted in Sushila Karki’s interim cabinet
Video source: Nepal Television/YouTube pic.twitter.com/26e5eOu0BD
— ANI (@ANI) September 12, 2025
नेपाळमध्ये Gen Z आंदोलकांनी सरकारी इमारती, प्रमुख राजकीय पक्षांचे कार्यालये आणि बड्या नेत्यांच्या घरांना आग लावली होती. या तीव्र हिंसक निदर्शनांमुळे केपी शर्मा ओली यांच्या सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. सातत्याने बिघडत चाललेल्या परिस्थितीमुळे लष्कराने देशाच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्या हाती घेतली. सध्या राजधानी काठमांडूसह देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये लष्कराचे जवान तैनात आहेत. हिंसक निदर्शनांमध्ये आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू झाला आहे.
आर्थिक संकटातून सावरण्याचे मोठे आव्हान –
नेपाळसमोर सध्या मोठ्या आर्थिक नुकसानातून सावरण्याचा प्रश्न आहे. हिंसक निदर्शनांमुळे झालेल्या नुकसानीमुळे देशाची अर्थव्यवस्था आणखी खालावली आहे. सुशीला कार्की यांना या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी कसोटी पणाला लावावी लागणार आहे.
सुशीला कार्की यांचा बनारसशी खास संबंध –
सुशीला कार्की यांचा जन्म 7 जून 1952 रोजी नेपाळच्या विराटनगर येथे झाला. त्यांनी 1975 मध्ये बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी येथून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि 1978 मध्ये त्रिभुवन विद्यापीठ, नेपाळ येथून कायद्याची पदवी मिळवली. 1979 मध्ये त्यांनी विराटनगर येथे वकिली सुरू केली आणि 1985 मध्ये धरान येथील महेंद्र मल्टिपल कॅम्पसमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून काम केले. 2007 मध्ये त्या वरिष्ठ वकील बनल्या. 22 जानेवारी 2009 रोजी त्यांची सुप्रीम कोर्टात तात्पुरती न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि 18 नोव्हेंबर 2010 रोजी त्या कायम न्यायाधीश बनल्या. 13 एप्रिल ते 10 जुलै 2016 या कालावधीत त्यांनी कार्यवाहक सरन्यायाधीश म्हणून आणि 11 जुलै 2016 ते 7 जून 2017 या कालावधीत सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले.
बनारसमधील भेट आणि वैवाहिक जीवन –
सुशीला कार्की यांचे पती नेपाळी काँग्रेसचे प्रमुख नेते दुर्गा प्रसाद सुबेदी आहेत. त्यांची भेट बनारस येथे शिक्षण घेत असताना झाली होती. या खास कनेक्शनमुळे बनारसशी त्यांचा विशेष संबंध आहे.




