Susgaon Accident – शहरातील अवजड वाहनांवर असलेली बंदी झुगारून डंपर, मिक्सर आणि इतर जड वाहने बिनधास्तपणे रस्त्यावर धावत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अशाच एका भरधाव काँक्रिट मिक्सर ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सुसगाव येथे गुरुवारी (दि. ५ मार्च) रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शिवबा चौक, सुस-नांदे रोड परिसरात झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अवजड वाहनांच्या बेफिकीर वाहतुकीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याप्रकरणी मिक्सर चालकासह मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजली शंकर साळवे (वय १८) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. राजपाल संभाजी कसबे (वय ३४, रा. बालाजी पेट्रोल पंपाजवळ, नांदे, ता. मुळशी) आणि गणेश महातेश्वर कलशेट्टी (वय ४०, रा. शिवणे, पुणे) अशी या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. शंकर लक्ष्मण साळवे (वय ४८, रा. सुसगाव, ता. मुळशी) यांनी शुक्रवारी (दि. ६) याबाबत बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली साळवे ही स्कुटीवरून सुस-नांदे रोडने आपल्या घरी जात होती. शिवबा चौकाजवळील मासे मार्केटसमोर ती पोहोचली असताना नांदे गावाच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या टाटा कंपनीच्या काँक्रिट मिक्सर ट्रकने तिच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. धडकेमुळे अंजली गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या रस्त्यावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी आहे त्या रस्त्यावरच हा मिक्सर ट्रक भरधाव वेगाने चालवण्यात येत होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात चालकाने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून निष्काळजीपणे वाहन चालविल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच जड वाहनांना बंदी असतानाही वाहन रस्त्यावर आणल्याबद्दल वाहन मालकालाही जबाबदार धरले जात आहे. हिंजवडी, बावधन, सुस, नांदे आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही महिन्यांत डंपर, मिक्सर आणि इतर अवजड वाहनांमुळे अनेक गंभीर अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी ठराविक वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी लागू केली आहे. मात्र अनेक चालक आणि वाहनमालक ही बंदी धाब्यावर बसवून शहरात अवजड वाहने चालवत असल्याचे वारंवार समोर येत आहे. स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही या समस्येबाबत आवाज उठवला होता. मात्र अद्यापही अवजड वाहनांवर प्रभावी नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. अंजली साळवे हिच्या मृत्यूमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून अशा वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बावधन पोलीस ठाणे करीत आहे.