Sunil Gavaskar slams Team India : कोलकाता येथील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघावर चौफेर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर, भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी कठोर शब्दांत भारतीय फलंदाज, संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयच्या निवडकर्त्यांचे कान टोचले आहेत. २२ नोव्हेंबरला गुवाहाटी येथील दुसऱ्या कसोटीत बरोबरी साधण्यापूर्वी गावस्करांनी संघाला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. चुकीचा पायंडा नको, कसोटी संघबांधणीवर पुनर्विचार करा – ‘स्पोर्ट्सस्टार’साठी लिहिलेल्या स्तंभातून गावस्कर यांनी कसोटी संघबांधणीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, कसोटी क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांच्या अष्टपैलू अवलंबून राहणे हा चुकीचा पायंडा आहे. संघाने स्पेशालिस्ट खेळाडूवरच विश्वास ठेवायला हवा. कोलकातातील पहिल्या कसोटीतील पराभवानंतर निवडकर्त्यांनी आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी कसोटी संघाच्या बांधणीवर तातडीने पुनर्विचार करणे आवश्यक आहे, असे रोखठोक मत त्यांनी मांडले आहे. फिरकीसमोर ढेपाळण्यामागचं कारण केलं स्पष्ट – घरच्या मैदानातील फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवरही भारतीय फलंदाजांचा संघर्ष दिसून आला. यामागचे कारण सांगताना गावस्कर म्हणाले की, कसोटी क्रिकेटसाठी आवश्यक असणारे धैर्य, संयम आणि शिस्तबद्ध खेळ यांचा अभाव दिसून येतो. सतत भारताबाहेर खेळल्यामुळे फलंदाजांना घरच्या मैदानात जुळवून घेण्यात अडचणी येत आहेत, ज्यावर तातडीने काम करण्याची गरज आहे. हेही वाचा – Hardik Pandya Engagement : हार्दिक-माहिकाने गुपचूप उरकला साखरपुडा? फोटो व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण खेळाडूंनी आपला अहंकार बाजूला ठेवावा – कसोटी क्रिकेटमध्ये यश मिळवण्यासाठी खेळाडूंनी आपला अहंकार बाजूला ठेवावा असा मोलाचा सल्ला गावस्करांनी दिला. ते म्हणाले, “प्रभावी मारा होत असताना गोलंदाजांना सन्मान देणे आणि संयमी खेळी करणे अपेक्षित आहे. कठीण परिस्थितीत फक्त मोठे फटके मारून प्रश्न सुटणार नाही, उलट परिस्थिती बिकट होते. मैदानात तग धरून राहणे आणि धावफलक हलता ठेवणे महत्त्वाचे आहे.” योग्य संधीची प्रतीक्षा करा आणि ती मिळेपर्यंत विनम्रतेने खेळा, हीच कसोटीतील यशाची गुरुकिल्ली असल्याचे गावस्करांनी फलंदाजांना बजावले आहे.