भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचं आयसीसी (ICC) पुरुष टी-२० क्रिकेटर ऑफ द इयर २०२२ पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. त्याच्यासोबतच इतर तीन खेळाडूंच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सॅम कुरन, झिम्बाब्वेचा अष्टपैलू सिकंदर रझा आणि पाकिस्तानचा यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान यांनाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. सूर्यकुमार यादवने यंदाच्या वर्षभरात टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीच्या बळावर भरपूर धावा केल्या आहेत. त्याचबरोबर तो सध्या जागतिक टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे.
सूर्यकुमारने २०२२ या वर्षभरात टी-२० प्रकारात खेळलेल्या ३१ सामन्यांमध्ये ४६.५६ च्या सरासरीने आणि १८७.४३ च्या तुफानी स्ट्राइक रेटने ११६४ धावा केल्या. या वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण करणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्याचवेळी त्याने या लहान प्रकारात २ शतकेही ठोकली आहेत. पुरस्कारासाठी नामांकित झालेल्या नावांमध्ये सूर्यकुमार हा प्रबळ दावेदार म्हणून दिसत आहे.
सूर्यकुमारने ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स या संघांविरुद्ध अर्धशतके ठोकली आहेत. यादरम्यान त्याने ५९.७५ च्या सरासरीने आणि १८९.६८ च्या तुफानी स्ट्राइक रेटने २३९ धावा केल्या. सूर्यकुमारने नॉटिंगहॅममध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते. त्याने ५५ चेंडूत ११७ धावा केल्या होत्या. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध माऊंट मौनगानुई येथे झालेल्या टी-२० सामन्यात त्याने ५१ चेंडूत १११ धावा करत दुसरे शतक ठोकले.
The ICC Men’s T20I Cricketer of the Year 2022 nominees include:
🤩 An exciting young talent
🔥 Two reliable batters
💥 A swashbuckling power-hitter#ICCAwards | Find out 👇— ICC (@ICC) December 29, 2022
झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रजासाठीही हे वर्ष अत्यंत खास राहिले. त्याने यंदाच्या वर्षभरात टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही बाजूंनी चमकदार कामगिरी केली. त्याने या प्रकारात वर्षभरात ७३५ धावा आणि २५ गडी बाद केले आहेत. टी-२० विश्वचषकात झिम्बाब्वेच्या संघाने पाकिस्तानला हरवण्याची अविश्वसनीय कामगिरी केली होती. यामध्येही रजा याचे सर्वाधिक योगदान राहिले होते. त्याचबरोबर टी-२० विश्वचषकात सॅम कुरनला त्याची कामगिरी पाहता प्लेअर ऑफ द टूर्नामेंट पुरस्कार देम्यात आला आहे.
पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानसाठी यंदाचे वर्ष विक्रमांनी सजलेलं राहील. त्याने या वर्षात टी-२० प्रकारात ९९६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने या प्रकारात १० अर्धशतके झळकावली आहेत. मर्यादित षटकांच्या प्रकारात रिझवान आता पाकिस्तानसाठी प्रमुख फलंदाज बनला आहे. सूर्यकुमार यादवनंतर तो सध्या जागतिक टी-२० क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.