पुणे : …अन् शिक्षण आयुक्तांनी छडी उगारली

पुणे –शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या आठ कृती गटांची (टास्क फोर्स) निर्मिती केली आहे. शिक्षण विभागाला शिस्त लावणे आणि विकासात्मक बदलांची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असेल.
मांढरे यांनी शिक्षण विभागात बदल करण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेत कृती गटाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रशासनामध्ये बदल करण्याची गरज, सेवांच्या गुणवत्तेत वाढ करणे, लोकाभिमुखता व निर्णयशीलता आणण्यासाठी उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी विविध कृती गटांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृतीगट प्रमुखांना अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मदतीने कामकाजाचे नियोजन करावे लागणार आहे. उद्दिष्टांची कालमर्यादेत पूर्तता झाली की नाही, याची तपासणी करण्यासाठी दर पंधरा दिवसांनी प्रगतीचा आढावा सादर करावा लागणार आहे. यासाठी विविध प्रकारची प्रपत्रे विकसित करण्याचे बंधनही आहे. उल्लेखनीय कामगिरी, दुर्लक्ष अथवा दिरंगाई केल्यास त्याबाबतची नोंद सेवापुस्तकात घेण्यात येणार आहे.
कृती गटातील अधिकारी आणि जबाबदारी
*डॉ. अशोक भोसले : सर्व कृतीगटांचा समन्वय
*हरुन आत्तार : क्षेत्रिय कार्यालयांची तपासणी, दक्षता पथकाचे कामकाज, विविध योजनांची अंमलबजावणी, शिक्षण आयुक्तांच्या दौऱ्याचे व्यवस्थापन करणे.
*डॉ. श्रीराम पानझडे : शीघ्र संदर्भ निराकरण, ई-गव्हर्नन्स.
*राजेश शिंदे :नवोपक्रम व दस्तऐवजीकरणाचे कामकाज.
*कमलकिशोर राठी :शासन निर्णय, न्यायनिवाडे या संदर्भात प्रबोधन.
*श्रीधर शिंत्रे :शिक्षण आयुक्तालयातील प्राप्त प्रकरणांचे व तातडीच्या संदर्भाचे नियोजन, कक्ष व्यवस्थापनाचे कामकाज.
*रजनी रावडे :मंत्रालय स्तरावरील संदर्भ, तक्रारी, जनसंपर्क, अभ्यागतांचे तातडीचे संदर्भ ठेवणे, जमिनी व बांधकामांचा आढावा.
*कृष्णा ढाळे :बैठक व्यवस्थापन, समिती कामकाजाचे नियोजन.





