Suraj Chavan : लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि अखिल भारतीय छावा संघटना यांच्यातील संघर्षाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी 20 जुलै रोजी रात्री उशिरा लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात गुपचूप शरणागती स्वीकारली. विशेष म्हणजे, पहाटेच्या सुमारास त्यांना जामीन देखील मंजूर झाला आहे. यामुळे शेतकरी संघटनेत संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळल्याने आणि तातडीने जामीन मिळाल्याने या प्रकरणावर नवे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. नेमकं काय घडलं? लातूरमध्ये 20 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आले होते. मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानसभेतील ‘रमी’ खेळण्याच्या कृतीविरोधात निषेध व्यक्त केला. त्यांनी तटकरे यांना निवेदन देताना टेबलावर पत्ते फेकले. यानंतर सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना कोपराने आणि बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, आणि सूरज चव्हाण यांच्यावर तीव्र टीका झाली. या प्रकरणानंतर लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात सूरज चव्हाण आणि इतर 10 जणांविरुद्ध भारतीय न्या संहितेच्या कलम 115, 118, 189, 190 आणि 191 अंतर्गत गुन्हा दाखल झाला. या प्रकरणातील 11 आरोपींपैकी सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर सूरज चव्हाण फरार होता. 20 जुलैच्या रात्री सूरज चव्हाण गुपचूप पोलीस ठाण्यात हजर झाला. एवढच नाही तर पहाटे त्याला जामीन देखील मंजूर करण्यात आला. पोलिसांनी ही प्रक्रिया गुप्त ठेवल्याने आणि तातडीने जामीन मिळाल्याने शेतकरी संघटनेने आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सूरज चव्हाणच्या तात्काळ अटकेची मागणी करत सरकारवर गुंडगिरीला पाठबळ देण्याचा आरोप केला आहे. सूरज चव्हाण कोण आहे? सूरज चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. लातूरच्या शिरूर अनंतपाळ येथील रहिवासी असलेले सूरज चव्हाण हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जातात. 2019 मध्ये अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधी दरम्यान पक्षातील आमदारांना परत आणण्यात सूरज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते अजित पवार गटासोबत गेले. सूरज चव्हाण हे राज्य सरकारच्या युवक कल्याण समितीवरही कार्यरत आहेत. यामुळे त्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.