Sunil Tatkare : मनपा निवडणुकीची जबाबदारी मंत्री भुजबळांवर; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दिले संकेत

नाशिक : छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांना पक्षाने नाशिक शहरात जास्त लक्ष देण्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे समीर भुजबळ हे उत्तम शोमॅन आहेत. १९९९ साली पक्षाच्या स्थापनेच्या कार्यक्रमाचे नियोजन देखील त्यांनी केले होते, असे सांगत आगामी मनपा निवडणुकीची जबाबदारी दोन्ही भुजबळांवर पक्षाने दिल्याचे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले.
तटकरे म्हणाले, बहुजन समाजाचे हित साधत असताना आपण एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आम्ही सर्व नेत्यांनी सर्वानुमते घेतला होता. त्यावेळी आमच्यावर टीका झाल्या. मात्र विधानसभेची निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढवली व आमचे ४१ आमदार निवडून आले. आताही आगामी निवडणुकादेखील आम्ही महायुती म्हणून लढणार आहे. तरीही स्थानिक पातळीवरील परिस्थिती व नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्याचा दौरा करीत आहे. राज्यात ठिकठिकाणी आमचे जोरदार स्वागत होत आहे, असे त्यांनी सांगितले. पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही विषय वेगळे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली भूमिका राजकीय आहे. २०१४ लाच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर आम्ही भाजपसोबत जाण्याची घोषणा केली होती. पक्षाची मूळ विचारधारा घेऊन आम्ही महायुतीसोबत गेलो असून, पुढेही कायम राहणार आहे.





