Supriya sule : “पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही”; सुप्रिया सुळेंनी सांगितलं कारण

Diwali | Supriya sule – राष्ट्रवादी काँग्रेस (शप) च्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी सांगितले की, पवार कुटुंबाने यावर्षी दिवाळी सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
आमच्या काकू भारती प्रतापराव पवार यांचे नुकतेच निधन झाले. त्या आपल्या सर्वांच्या आईसारख्या होत्या. म्हणूनच, आम्ही संपूर्ण पवार कुटुंबाने एकत्रितपणे यावर्षीची दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्याच्या बारामती परिसरातील गोविंदबाग येथे दिवाळी पाडव्यानिमित्त वार्षिक दिवाळी उत्सव आणि नातेवाईकांना भेटण्याचा कार्यक्रमही यावर्षी होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. शरद पवार यांचे धाकटे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार (७७) यांचे या वर्षी मार्चमध्ये निधन झाले आहे.
कार्यकर्त्यांचा हिरमोड :
दरम्यान दरवर्षी पवार कुटुंब एकत्र येत अत्यंत उत्साहात दिवाळी साजरी करतात. बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी दिवाळीचा मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचे कुटुंब असल्याने या कार्यक्रमाला खास महत्त्व असते.
दिवाळीच्या पाडव्याला अनेक कार्यकर्ते आणि हितचिंतक शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी गोविंदबागवर आवर्जून येतात. या भेटीगाठींच्या कार्यक्रमातून शरद पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधतात.
ज्यामुळे या दिवाळीला एक राजकीय आणि सामाजिक महत्त्व प्राप्त होते. मात्र यंदा पवार कुटुंबिय दिवाळी साजरी करणार नसल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.





