Supriya Sule on Ajit Pawar joining BJP – शिवसेनेत झालेलं बंड, त्यानंतर राज्यात झालेलं सत्तापरिवर्तन, शिवसेना पक्ष व धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हे धक्के कमी म्हणून की काय महाराष्ट्राला चाहूल लागली आहे ती आणखी एका राजकीय भूकंपाची. समाजीक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या ट्विटमुळे या चर्चांना नव्याने तोंड फुटले असले तरी या चर्चा अधून मधून सुरूच असतात. या चर्चा आहेत अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या. अशातच आता, अजित पवार खरंच भाजपसोबत जाणार का? या प्रश्नाचं उत्तर खुद्द सुप्रिया सुळे यांनी दिल आहे.
अंजली दमानिया यांनी काय ट्विट केलं आहे?
“आज मंत्रालयात एका कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गंमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे १५ आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपाबरोबर जाणार आहेत. तेही लवकरच. बघू. आणखीन किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची.” असं ट्विट अंजली दमानिया यांनी केलं आहे. त्यांच्या याच ट्विटमुळे सध्या अजित पवार खरंच भाजपसोबत जाणार का? हा प्रश्न चर्चिला जातोय. दमानिया यांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
अंजली दमानिया यांच्या ट्विटबाबत विचारले असता अजित पवार यांनी, “एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार?” अशी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? । Supriya Sule on Ajit Pawar joining BJP
अंजली दमानियांनी केलेल्या दाव्यानुसार अजित पवार खरंच भाजपाबरोबर जाणार आहेत का? या प्रश्नावर सुप्रिया सुळेंनी पावसाच्या उदाहरणासह सूचक विधान केलं आहे. “१५ मिनिटांनी इथे मुळशीत पाऊस पडेल का? याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. आत्ता उन आहे हे मी सांगू शकते. पण १५ मिनिटांनी पाऊस पडेल की नाही याचं उत्तर माझ्याकडे नाही”, असं त्या म्हणाल्या.