Supriya Sule: “पोषण आहाराच्या दर्जाची चौकशी करा!” आहाराच्या निकृष्ट दर्जावरून सुप्रिया सुळे आक्रमक
Supriya Sule: अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळांमधील निकृष्ट पोषण आहाराची तातडीने चौकशी करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी.

Supriya Sule – अंगणवाडी तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन त्याची चौकशी झाली पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारने एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याऐवजी या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राला दिले पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवार, दि.३० रोजी केली.
श्री क्षेत्र भीमाशंकर येथे ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेवून खासदार सुप्रिया सुळे माघारी येत असताना घोडेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम, युवक अध्यक्ष विशाल वाबळे, पंचायत समितीच्या सदस्या श्वेताताई ढोबळे, प्रियंका वाघ, शरद बँकेचे माजी अध्यक्ष जयसिंग काळे, कपिल काळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, लहान मुलांच्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी येत असतील तर त्याची चौकशी करण्यात गैर काहीच नाही. काही चुकीचे आढळल्यास ते तातडीने दुरुस्त केले पाहिजे. अन्नधान्य तसेच महिला व बालविकास विभागाशी संबंधित या प्रश्नावर मुख्यमंत्री यांनी कोणतेही राजकारण न आणता योग्य ती कार्यवाही करावी, असे सुळे यांनी सांगितले.
दरम्यान, भीमाशंकरच्या विकासकामांबाबतही सुळे यांनी नाराजी व्यक्त केली. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा भाविकांची गैरसोय अधिक जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. विकास आराखड्यासाठी मोठा निधी खर्च होत असताना त्याचा परिणाम प्रत्यक्षात दिसत नाही.याबाबत मुख्यमंत्री यांना पत्र लिहून भीमाशंकर विकास आराखड्याची पाहणी व आवश्यक कार्यवाहीची मागणी करणार असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.





