Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी शासकीय सदनिका गैरव्यवहार प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. काल शुक्रवारी १९ डिसेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात पार पडली. या सुनावणीत कोकाटे यांना अंशत: दिलासा मिळाला असून, १ लाखाच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची अटकही टळली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयात कोकाटे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील रवी कदम यांनी बाजू मांडली होती. कोकाटे यांच्या सदनिका प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. गेल्या आठ महिन्यात हे सरकार आलेले आहे, या महिन्यात दोन मंत्र्यांवर टोकाचे आरोप झालेले आहेत. हे दुर्देव असून यामध्ये सरकारची आणि राज्याचे बदनामी होते. दिल्लीत मला जो भेटत होता तो विचारत होता. “अरे क्या हुआ तुम्हारे यहाँ और एक विकेट चला गया, क्या हुआ तुम्हारा मंत्री जेल में गया? तुम्हारा महाराष्ट्र ऐसाही है! यामुळे मला खूप वाईट वाटलं, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. मुंबईतील यशंवतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या, मी विरोधात आहे म्हणून नाही तर पहिले प्रेम माझं राज्यावर आहे, नंतर राजकारण; पण ज्या महाराष्ट्राचा अभिमान मला आहे त्याची बदमानी काश्मिर टू कन्याकुमारी होते. दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला हे राज्यासाठी किती घातक आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोकाटे यांच्यावर भाष्य करत आधी वेडेवाकडे स्टेटमेंट केले. शेतकऱ्यांचा अपमान केला. हे पण काय कमी बोलले, आज ते रुग्णालयात आहेत. त्यांची तब्येत बरी व्हावी, ही प्रार्थना करते. त्यामुळे टीका टिप्पणी नको, अशा शब्दांत त्यांनी कोकाटे यांच्या सदनिका प्रकरणावर भाष्य केले. शासकीय सदनिकेसाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने आणि नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवले. दोन वर्षांची शिक्षा त्यांना ठोठविण्यात आली आहे. याच निर्णयावर त्यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते. हे प्रकरण त्यांना भोवले असून, त्यांना यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला आहे. त्यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी पक्षाला हा दुसरा धक्का बसला आहे. या अगोदर धनंजय मुंडे यांनीही आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. कोकाटे लीलावती रुग्णालयात दाखल असून ते उपचार घेत आहेत. हेही वाचा : राजधानी एक्स्प्रेसच्या अपघातात आठ हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले