माणिकराव कोकाटेंनंतर आणखी एका बड्या मंत्र्याच्या विकेटची पाहतोय; रोहित पवारांचे सुचक ट्वीट

Manikrao Kokate | राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या अटकेची शक्यता वाढल्यानंतर अखेर त्यांनी क्रीडमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी त्यांच्या राजीनाम्याला मान्यता दिली आहे. यानुसार, कोकाटे यांच्याकडील सर्व खाती तात्पुरत्या स्वरूपात अजित पवार यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहे.
कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आली असताना त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. यातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आणखी एका बड्या मंत्र्याची विकेट पडणार असल्याचे सूचक ट्वीट केले आहे.
रोहित पवार यांचे ट्वीट
“मंत्री कोकाटे यांचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्याने नाईलाजाने घेतलेला हा निर्णय आहे. वास्तविक नैतिकतेच्या आधारावर कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली तेव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने तरी त्यांचा राजीनामा घेऊन सरकार खऱ्या अर्थाने ‘वेगवान’ आहे हे दाखवून द्यायला हवं होतं. यामुळं किमान कायद्याचा सन्मान तरी राखला गेला असता आणि ‘कायदा व न्याय हे सर्वांसाठी समान आहे,’ असा चांगला संदेशही समाजात गेला असता. पण माणिकराव कोकाटे यांच्याकडून असे करणंच चुकीचं आहे,” असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
पुढे बोलताना त्यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे नाव घेऊन खळबळ उडवून दिली आहे. या राजीनाम्यातून अनेकजण धडा घेतील, ही अपेक्षा आहे. आम्ही मात्र मंत्री संजय शिरसाठ यांच्याही विकेटची वाट पहात आहोत, असे पवार म्हणाले आहेत.
मंत्री कोकाटे यांचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्याने नाईलाजाने घेतलेला हा निर्णय आहे…!
वास्तविक नैतिकतेच्या आधारावर कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली तेंव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने तरी त्यांचा राजीनामा घेऊन सरकार खऱ्या अर्थाने ‘वेगवान’…— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 17, 2025
माणिकराव कोकाटे यांच्यावरील आरोप –
कृषिमंत्री कोकाटे हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिन्नर विधानसभेचे आमदार आहेत. विधानसभेत रम्मी खेळण्यामुळे अडचणीत आल्यानंतर त्यांचे कृषिमंत्रिपद काढून घेण्यात आले. यानंतर त्यांना युवक कल्याण आणि क्रीडाखाते देण्यात आले होते. १९९५ ते ९७ काळात सरकारच्या १० टक्के कोट्यातून कोकाटे यांनी घर घेतले. कोकाटे यांनी १० टक्के कोट्यातील घरासाठी कमी उत्पन्न दाखवले असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल केला होता.
जवळपास तीन दशके या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी कोकाटेंविरोधात याचिका दाखल केली होती. कनिष्ठ न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. हीच शिक्षा आता सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कोणत्याही लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेली असेल तर त्याचे लोकप्रतिनिधीत्त्व रद्द होते.
संजय शिरसाट विरोधकांच्या निशाण्यावर
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्यावर तब्बल ५ हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. शिरसाठ यांनी २०२४ साली सिडकोचे अध्यक्ष होताच नवी मुंबईतील १५० एकर जमीन बिवलकर कुटुंबाला दिली, ज्यामुळे स्थानिक भूमीपुत्रांशी गद्दारी झाल्याचेही पवार यांनी म्हटले होते. मंत्री संजय शिरसाट हे गेल्या काही महिन्यापासून अनेक वादामुळे चर्चेत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेंद्रा एमआयडीसीतील भूखंड, व्हिट्स हाॅटेल खरेदी, शहरात मोक्याच्या जागेवर भूखंड खरेदी, सामाजिक न्याय विभागातील टेंडर घोटाळा अशा अनेक आरोपांमुळे संजय शिरसाट विरोधकांच्या निशाण्यावर आहेत.
हेही वाचा:
PMC Election: भाजप-शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब; आज जागावाटपासाठी महत्त्वाची बैठक




