गुजरात पोलिसांना सुप्रीम कोर्टाने फटकारले; मुस्लिम युवकांना खांबाला बांधून केली होती मारहाण

नवी दिल्ली – गुजरातच्या खेडा येथे २०२२ मध्ये गरबा कार्यक्रमावर झालेल्या दगडफेक प्रकरणी गुजरात पोलिसांनी काही मुस्लिम युवकांना खांबाला बांधून मारहाण केली होती. या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने राज्याच्या पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले. कोणत्या कायद्याच्या आधारावर तुम्ही हे कृत्य केले असा सवाल न्यायलयाने यावेळी उपस्थित केला.
न्या. बी. आर. गवई आणि न्या. संदीप मेहता यांनी पोलिसांच्या कृतीबद्दल तिव्र नाराजी व्यक्त केली. हा कोणत्या प्रकारचा अत्याचार आहे. तुम्ही लोकांना खांबाला बांधून मारहाण करतात आणि त्यानंतरही आमच्याकडे म्हणजे न्यायालयाकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा करतात. मुळात कोणाला असे बांधून मारहाण करण्याचा अधिकार तुम्हाला दिलाच कोणी?
आता उच्च न्यायालयाने तुम्हाला १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे तर त्याचा आनंद घ्या. आमच्याकडून कोणत्या दिलाशाची अपेक्षा करू नका. गुजरात उच्च न्यायालयाने या प्रकरणातील चार दोषी पोलिसांना १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्याला या पोलिसांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. आरोपींच्या वारंवार विनवणीनंतर सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण सुनावणीला घेतले आणि आरोपींच्या पोलीस कोठडीला स्थगिती दिली.
ऑक्टोबर २०२२ मध्ये खेडा नाडीयादच्या उंधेला गावात गरबा सुरू असताना तेथे दगडफेक झाली होती. पोलिसांनी १३ मुस्लिम युवकांना अटक केली होती. यातील काहींना विजेच्या जाहीरपणे मारहाण करण्यात आली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि पोलिसांच्या या कृत्याविरूध्द प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.





