Eknath Shinde : अपक्ष उमेदवाराला पाठिंबा; पुण्यातून एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
Eknath Shinde : अखेर या चर्चांना पूर्णविराम देत एकनाथ शिंदे यांनी अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

Eknath Shinde : पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांच्या घोषणेनंतर महायुतीमधील अंतर्गत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मंगेश चिवटे यांना उमेदवारी जाहीर केली होती.
मात्र, चिवटे यांनी पक्षाध्येश म्हणून निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शिवसेना कोणाला पाठिंबा देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत एकनाथ शिंदे यांनी अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
पुणे दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी पुणे शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवत असली, तरी काही मतदारसंघांमध्ये अपवाद असू शकतात, असे त्यांनी सांगितले.
“आम्ही महायुती म्हणून एकत्रित ही निवडणूक लढवत आहोत. पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी आमचा पाठिंबा सचिन सानप यांना आहे. महायुती म्हणून लढत असलो तरी काही ठिकाणी अपवाद आहेत, काही ठिकाणी मैत्रिपूर्ण लढत होईल. पण पाचही जागा या महायुतीच्या निवडून येतील.” असे एकनाथ शिंदे म्हणाले.
सचिन सानप यांना शिवसेनेचा पाठिंबा
सचिन सानप यांनी यापूर्वी पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा मिळावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी याआधी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून काम केले आहे.
आता शिवसेनेने सानप यांना पाठिंबा जाहीर केल्याने पुणे शिक्षक मतदारसंघातील राजकीय समीकरणांबाबत चर्चा सुरू झाली आहे. भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर आणि शिवसेनेने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यानंतर महायुतीतील जागावाटप आणि समन्वयाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या निर्णयामुळे महायुतीतील घटक पक्षांची पुढील भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Satara: शेतकर्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्यासाठी प्रयत्न सुरु; पालकमंत्री शंभूराज देसाई






