Bhivrabai Sawant : माजी मंत्री तानाजी सावंतांना मातृशोक! 105 व्या वर्षी आईचे निधन
Bhivrabai Sawant : भिवराबाई सावंत यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव येथील आपल्या राहत्या घरी मंगळवारी रात्री अखेरचा श्वास घेतला.

Bhivrabai Sawant : महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तानाजी सावंत यांच्या मातोश्री भिवराबाई तुकाराम सावंत यांचे वयाच्या १०५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने सावंत कुटुंबीयांसह वाकाव परिसरात शोककळा पसरली आहे.
वाकाव येथे राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
भिवराबाई सावंत यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव येथील आपल्या राहत्या घरी मंगळवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. त्या ‘आक्का’ या नावाने परिचित होत्या. बुधवारी सकाळी १० वाजता वाकाव येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. आईच्या अंत्यसंस्कारासाठी तानाजी सावंत सकाळीच वाकाव येथे दाखल झाले होते.
संघर्षातून उभा केला संसार
पतीच्या निधनानंतर भिवराबाई सावंत यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पाच मुलांचा सांभाळ केला. कष्ट, जिद्द आणि हिमतीच्या जोरावर त्यांनी कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलली. काही काळापूर्वी उपचार आणि देखभालीसाठी त्या पुण्यातील त्यांचे धाकटे पुत्र प्रा. तानाजीराव सावंत यांच्याकडे राहण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्या पुन्हा आपल्या मूळ गावी वाकाव येथे परतल्या.
राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून श्रद्धांजली
भिवराबाई सावंत यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. अनेकांनी वाकाव येथे जाऊन सावंत कुटुंबीयांचे सांत्वन केले. दीर्घायुष्य लाभलेल्या भिवराबाई सावंत यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.





