Dhananjay Munde : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या पोकळीमुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांकडे असलेली महत्त्वाची पदे आणि खाती कोणाकडे जाणार, यावर जोरदार चर्चा सुरू असतानाच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राजकीय अज्ञातवासात गेलेले माजी मंत्री धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रात्री उशिरा झालेल्या बंद दाराआड बैठकीनंतर अवघ्या 24 तासांत मुंडेंच्या पुनरागमनाची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास होकार दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्तासूत्रे पुन्हा एकत्र येताना दिसत आहेत. पक्षाला एकसंध ठेवण्यासाठी पवार कुटुंबातीलच व्यक्तीकडे नेतृत्व असावं, अशी भूमिका भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळेच पक्षप्रमुखपदासाठीही सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. अर्थखात्यावरून रस्सीखेच अजित पवार यांच्याकडे असलेली अर्थ, क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क ही महत्त्वाची खाती कुणाकडे सोपवायची, यावर सध्या जोरदार खलबतं सुरू आहेत. विशेषतः अर्थखातं राष्ट्रवादीकडेच ठेवण्यासाठी पक्ष प्रयत्नशील असल्याचे समजते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात बंद दाराआड महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे. धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रिमंडळात एन्ट्री? सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्तारात धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू आहेत. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रिमंडळातील रिक्त जागा भरताना मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता वाढली आहे. मुंडेंनी कधी दिला होता राजीनामा? संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक झाल्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली होती. सरकारवर दबाव वाढल्यानंतर प्रकृतीचे कारण देत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र आता परिस्थिती बदलत असून, मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचीही माहिती समोर आली होती. पार्थ पवारांनाही मिळणार संधी? दरम्यान, सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची जागा रिक्त झाल्यानंतर पार्थ पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याचीही चर्चा सुरू आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार कुटुंबाभोवती पुन्हा एकदा सत्ताकेंद्र निर्माण होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.