दक्षिण पुण्याला सुपर स्पेशालिटी आरोग्य सुविधा : आमदार माधुरी मिसाळ

पुणे – बिबवेवाडीतील ईएसआयसीच्या जागेवर सर्व सुपर स्पेशालिटी आरोग्य सुविधांनी परिपूर्ण ५०० खाटांचे रुग्णालय दक्षिण पुण्यासाठी वरदान ठरेल, असा विश्वास पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला.
मिसाळ यांच्या प्रचारार्थ बिबवेवाडी, अप्पर सुपर इंदिरानगर, व्हीआयटी कॉलेज, २७६ ओटा, अप्पर डेपो परिसर या भागात प्रचारफेरी आयोजित करण्यात आली होती. दीपक मिसाळ, माजी नगरसेवक रूपाली धाडवे, वर्षा साठे, विनीत पिंगळे, अजय भोकरे, अविनाश खेडेकर, बाबुराव घाडगे, स्वप्निल माकुडे, अविनाश कुलकर्णी, विक्रम फुंदे, सचिन मारणे, राहुल पाखरे, मीनानाथ पराडकर, वैभव देवकर, गणेश अर्जुने यांच्यासह महायुतीच्या घटकपक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिसाळ म्हणाल्या, कामगार विमा रुग्णालयाच्या १६ एकर जागेत सात मजली इमारतीत ५०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी सुरू आहे. त्यातून पर्वती, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांना दर्जेदार, अत्याधुनिक आरोग्यसुविधा मिळणार आहेत. याशिवाय अतिदक्षता विभाग, बाह्यरुग्ण कक्ष, बाह्य आणि सर्व प्रकारच्या आंतररुग्ण सुपरस्पेशालिटी सुविधांसाठी स्वतंत्र कक्ष, साधारण व अतिदक्षता कक्षही असणार आहे. रेडिओलॉजी, बायोकेमेस्ट्री, मायक्रोबायोलॉजी अशा विविध प्रयोगशाळांची सुविधा मिळणार असून, कोरोना काळात आमदार निधीतून या रुग्णालयातून ऑक्सिजन प्लांट आणि व्हेंटिलेटर पुरविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“प्रत्येक निवडणुकीत ससूनच्या धर्तीवर रुग्णालय उभारू, अशी घोषणा काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून केली जात होती. मात्र, ती कधीही प्रत्यक्षात आली नाही. केंद्र सरकारच्या मदतीने आम्ही ती प्रत्यक्षात आणली.” – माधुरी मिसाळ, उमेदवार, महायुती





