Pune Municipal Corporation: झाडणकाम निविदा ; रस्त्यांच्या आकडेवारीची होणार सफाई
Pune Municipal Corporation:

परफॉर्मन्स बेस्ड उपक्रम नियोजनातील अनागोंदी समोर
Pune Municipal Corporation: महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहराच्या स्वच्छतेसाठी सुरू केलेल्या प्रायोगिक तत्त्वावरील परफॉर्मन्स बेस्ड झाडूकाम उपक्रमाच्या नियोजनातच मोठी अनागोंदी समोर आली आहे.
शहरातील रस्त्यांची प्रत्यक्ष लांबी सुमारे २३९६ कि.मी. असताना झाडूकामासाठी करण्यात आलेल्या मॅपिंगमध्ये तब्बल साडेआठ हजार कि.मी. रस्ते दाखविण्यात आले आहेत. यामध्ये आता मोठ्या सोसायट्यांमधील अंतर्गत खासगी रस्तेही समाविष्ट असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आधी केलेल्या मॅपिंगची पुन्हा पडताळणी करून खासगी आणि दुबार मोजणी झालेले रस्ते वगळण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढवली आहे.
शहर स्वच्छतेसाठी झाडणकामाच्या ठेकेदारांकडील कर्मचाऱ्यांची संख्या साडेचार हजारांवरून थेट नऊ हजार करण्यात आली. त्यासाठी शहरातील झाडूकामाच्या हद्दी निश्चित करताना प्रत्येक ७०० मी.च्या हद्दीनुसार मनुष्यबळ निश्चित करण्यात आले. मात्र, हद्द निश्चित करण्यापूर्वीच रस्त्यांची अचूक मोजणी आणि वर्गवारी करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
परिणामी, सार्वजनिक रस्त्यांसोबत खासगी सोसायट्यांचे अंतर्गत रस्तेही झाडूकामाच्या मॅपिंगमध्ये आले.विशेष म्हणजे, तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या या उपक्रमामुळे सार्वजनिक स्वच्छतेत सुधारणा झाल्याचा दावा बैठकीत करण्यात आला. मात्र, त्याच बैठकीत मॅपिंगमध्ये खासगी रस्ते समाविष्ट झाल्याचे मान्य करून सुधारित हद्दी निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे नेमक्या किती किलोमीटर रस्त्यांसाठी किती मनुष्यबळ आणि किती खर्च निश्चित करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गैरहजर कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनेक कायमस्वरूपी सफाई सेवक वर्षानुवर्षे गैरहजर असल्याचेही बैठकीत स्पष्ट झाले. पाच वर्षांहून अधिक काळ सतत गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर बदली किंवा बडतर्फीची कारवाई करण्याचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकीकडे कायम कर्मचारी गैरहजर आणि दुसरीकडे ठेकेदारांकडील मनुष्यबळ दुप्पट करण्याची वेळ आलेल्या प्रशासनाच्या नियोजनावरही त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





