Sunita Williams: मला सुनीताची रोज आठवण येते.! सुनीता विल्यम्सच्या आईची प्रतिक्रिया आली समोर; काय म्हणाल्या पाहा…

Sunita Williams | Bonnie Pandya – अंतराळ स्थानकावर गेलेले नासाचे अंतराळवीर बुच विल्मर आणि सुनिता विल्यम्स यांना फेब्रुवारी महिन्यापर्यंत अंतराळ स्थानकातच रहावे लागणार आहे. या दोन्ही अंतराळवीरांना अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परत आणण्यासाठीच्या बोईंग कॅप्स्यूलमध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे या कॅप्स्यूलमधून या दोघांना पृथ्वीवर आणणे धोक्याचे आहे, असे अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने म्हटले आहे.
स्पेसएक्सच्या कॅप्स्यूलद्वारे त्यांना पुन्हा पृथ्वीवर आणण्यात येईल. मात्र त्यासाठी पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत या दोन्ही अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावरच रहावे लागणार आहे. जून महिन्याच्या प्रारंभापासून हे दोघेही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरच अडकून पडले आहेत. या दोघांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी नियोजित असलेल्या कॅप्स्यूलमधून हेलियम वायूची गळती व्हायला लागली आणि थ्रस्टरच्या अपयशामुळे त्यांचे पृथ्वीवर परत येणे लांबणीवर पडले आहे.
त्यांना परत आणण्यासाठी नासाच्या अभियंत्यांनी वेगवेगळ्या पर्यायांच्या शक्यता आजमावून बघितल्या आहेत. सविस्तर अभ्यास करण्यासाठी जवळपास तीन महिने घालवायला लागले. त्यानंतर नासाच्या वरिष्ठ संशोधकांनी स्पेसएक्सच्या कॅप्स्यूलचा वापर करण्याचा निर्णय घेतला.
ही कॅप्स्यूल फेब्रुवारी महिन्यात अंतराळ स्थानकावर सोडली जाणार आहे. नासाची रिक्त स्टारलाइनर कॅप्सूल सप्टेंबरच्या सुरुवातीला अनडॉक होईल आणि ऑटोपायलटवर परत आणण्याचा प्रयत्न केला जाईल. ही रिकामी कॅप्स्यूल न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात उतरेल. असं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, संपूर्ण जगाला सुनीताची चिंता लागलेली असतानाच तिच्या आईची प्रतिक्रिया समोर आली आहे. सुनीताची आई ‘बोनी पंड्या’ यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझी मुलगी सुरक्षित आहे, एवढीच माहिती मला देण्यात आली आहे. जोपर्यंत ती अंतराळात सुरक्षित आहे, तोपर्यंत मला या बातमीनं काळजी वाटत नाही, असं बोनी यांनी सांगितलं.
यावेळी बोलताना बोनी पंड्या म्हणल्या की, सुनीताला परत आणण्यासाठी नासाने कोणतीही घाई केली नाही. तिच्या सुरक्षेला नासाने पहिलं प्राधान्य दिलंय. खरं सांगू का? नासाने तिला परत आणण्यासाठी घाई केली नाही याचं मला बरं वाटलं. आधीच्या दोन शटलची दुर्घटना झाली आहे. माझ्या मुलीसोबत असं व्हावं असं मला वाटत नाही.
माझ्या मुलीच्याच काय कुणाच्याही सोबत असं होऊ नये असं मला वाटतं. त्यामुळेच पश्चात्ताप करण्यापेक्षा सुरक्षित राहणं मला सर्वात महत्त्वाचं वाटतं, मला सुनीताची रोज आठवण येते. कारण ती माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. आम्ही एकत्र काही तरी करण्याची योजना आखली होती. पण मी या गोष्टी आता समजू शकते, असंही त्यांनी सांगितलं.
हे देखील नक्की वाचा…..





