Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुख्य मंदिरात दगडूशेठ गणपतीची आरती
Sunetra Pawar:

Sunetra Pawar: अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आज भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुख्य मंदिरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या उत्सवानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. त्यापूर्वी मुख्य मंदिरात गणरायाची विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली. आरतीच्या वेळी गणपती बाप्पाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत बाप्पाचे दर्शन घेतले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने यंदा गणेशोत्सवाचे १३४ वे वर्ष साजरे करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सव मंडप, आकर्षक सजावट आणि विविध धार्मिक-सामाजिक उपक्रमांमुळे गणेशोत्सवाची विशेष रंगत पाहायला मिळाली. ट्रस्टच्या अधिकृत माहितीनुसार, यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक २५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे.
दगडूशेठ गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठीही जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदा बाप्पा ‘श्री वक्रतुंड’ रथातून मिरवणुकीत सहभागी होणार असून, रथाची आकर्षक विद्युत रोषणाई हे या मिरवणुकीचे विशेष आकर्षण असणार आहे. बेलबाग चौकातून दुपारी ४ वाजता दगडूशेठ गणपती मिरवणुकीत सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, अनंत चतुर्दशीमुळे पुणे शहरात विविध गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
दगडूशेठ गणपतीचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून भाविक पुण्यात दाखल झाले आहेत. मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण असून, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात बाप्पाला निरोप देण्याची तयारी सुरू आहे.





