Sunetra Pawar : जनता दरबार अन् अधिकाऱ्यांची कानउघाडणी! सुनेत्रा पवारांनी बारामतीत राबवला अजितदादा पॅटर्न
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती येथील 'सहयोग' निवासस्थानी आयोजित जनता दरबारात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

Sunetra Pawar – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यावेळी नागरिकांनी सार्वजनिक वैयक्तिक समस्या मांडल्या. काही समस्यांवर जागीच तोडगा काढण्यात आला तर काही समस्यांवर तोडगा काढण्यासाठी यावेळी सूचना करण्यात आल्या. यावेळी पवार यांनी बारामती तालुक्यातील माळेगाव कारखाना, दूध संघ, खरेदी-विक्री संघ आदी सहकारी संस्थांच्या संचालक मंडळासोबत संवाद साधत कामकाजाचा आढावा घेतला.
(स्व) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच बारामती येथे जनता दरबार भरला आहे. बारामतीतील सहयोग निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थितांच्या समस्या व प्रलंबित प्रश्नांबाबत माहिती जाणून घेतली. यासंदर्भात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले.
सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी परिवाराच्या सदस्यांशी विविध विषयांबाबत चर्चा करून पक्षकार्याचा आढावा घेत उपस्थितांच्या भावना जाणून घेतल्या. आवश्यक मार्गदर्शक सूचना केल्या.बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांशी संवाद साधला. यावेळी कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, पदाधिकारी उपस्थित होते.
अजितदादांप्रमाणे जनतेचे प्रश्न ऐकले
अजित पवार हे ज्या पद्धतीने बारामतीत आल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठकीत विविध विकास कामांचा आढावा घेत होते. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून विविध कामांचा आढावा घेतला. विकासकामांविषयी तसेच विविध समस्यांविषयी सूचना व निर्देश दिले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळासोबत बैठक घेतली. तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळासोबत देखील त्यांनी संवाद साधला.





