निसर्गगाणे : निसर्गाशी जवळीक

निसर्ग आणि माणूस याचं एक आगळं वेगळं असं अतूट नाते आहे. थोर तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती म्हणतात की, माणूस हा निसर्गाचाच एक भाग आहे. तो निसर्गाशीच जवळीक साधून आपलं जीवन सुखाने जगू शकतो.
मानवी जीवनातून जर निसर्ग दूर झाला, तर माणसाच्या जीवनाला आणि त्याच्या जगण्यालाही काहीच अर्थ राहणार नाही. कारण निसर्ग म्हणजे काय? तर निसर्ग म्हणजे त्या भगवंताने माणसाच्या सभोवतीच निर्माण केलेली सृष्टी. एक अद्भुत चमत्कारांनी नावीन्यांनी भरलेलं जग. या निसर्गात काय नाही? निसर्ग या एका कल्पनेत सागर, धरती, पर्वत, वने, डोंगर, दऱ्या, नद्या, पशू, पक्षी, सूर्य, चंद्र, तारे, वृक्ष, लता, वेली या सगळ्यांच्या बरोबरच माणसाचाही समावेश आहे.
माणसाला या निसर्गाच्या सान्निध्यात जायला, तो पाहायला, त्याचा सुखद अनुभव घ्याला का हवं हवेसे वाटते कारण तो निसर्ग माणसाला जीवन जगायचं कसं आणि निसर्गाचा अस्वाद घेत आपणच आपले जीवनगाणे हे सुमधुर कसे करायचे ते शिकवत असतो. या निसर्गातला प्रत्येक लहान मोठा घटक हा आपल्याला नेहमीच काहीना काहीतरी नव्याने सांगत, शिकवत असतो.
मग त्यातला रोजचा नवा सूर्योदय असेल, रणरणती दुपार असेल किंवा शीतल वाऱ्यासह आकाश खुलवीत जाणारी रम्य संध्याकाळ असेल. त्या प्रत्येकात काहीना काही तरी सांगावा, शिकवण ही लपलेली आहेच. त्या प्रत्येकाकडून मिळणारे जीवन समृद्धीचे धडे घेण्यासाठीच आपण मात्र या बिनभिंतीच्या शाळेत जावे. त्या शाळेतल्या प्रत्येकाकडून शिकाव लागतं आणि आपलं जीवन समृद्ध करून घ्यावे लागते.
निसर्ग केवळ आपल्याला बोधच करत नाही तर तो आपल्या शरीराचा, मनाचा ताण दूर करतो. एक निराशेची, नैराश्याची, निष्क्रियेतेची मरगळ दूर करतो. आपल्याला निसर्ग कार्यप्रेरित करतो आणि ते कार्य हे कसे गुणवत्तापूर्ण, अचूक आणि
सर्वोत्तम व्हायला हवे हे सांगतही असतो.





