Nordea Open 2024 : सुमीत नागलची एकेरीत विजयी सलामी तर दुहेरीतील आव्हान मात्र संपुष्टात….

Nordea Open 2024 बस्ताड (स्वीडन) : ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला भारतीय टेनिसपटू सुमित नागल आणि त्याचा पोलंडचा जोडीदार कॅरोल ड्रझेविक यांचे नॉर्दिया ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. मंगळवारी, 59 मिनिटे चाललेल्या पुरुष दुहेरीच्या लढतीत त्यांना अलेक्झांडर मुलर आणि लुका व्हॅन ॲशे या फ्रेंच जोडीने 6-3, 6-4 ने पराभूत केले. मात्र, 26 वर्षीय भारतीय खेळाडूने एकेरीत आव्हान कायम राखले आहे.
एकेरीत आव्हान कायम…
दुसरीकडे याच स्पर्धेतील एकेरीच्या लढतीत सुमित नागल याला अखेर इलियास यमेरचा पराभव करण्यात यश आले. त्याने स्वीडन येथे चालू असलेल्या नॉर्डिया ओपन टेनिस स्पर्धेतील पहिल्या फेरीत यमेरला सरळ सेटमध्ये पराभूत करून विजयी सुरुवात केली. भारतीय खेळाडू नागल याने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळवलेला स्थानिक खेळाडू इलियास यमेर याचा 6-4, 6-3 असा पराभव केला.
Special from Sumit ⛰@nagalsumit is round 2 bound 6-4 6-3 🆚 E.Ymer@NordeaOpen | #NordeaOpen pic.twitter.com/SZMTv9uREM
— ATP Tour (@atptour) July 16, 2024
नागलला यापूर्वी येमेरविरुद्ध खेळलेल्या मागील दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. नागलला गेल्या वर्षी स्प्लिट ओपनमध्ये (क्रोएशिया) आणि 2019 च्या लियोन ओपनमध्ये (फ्रान्स) येमेरकडून पराभव पत्करावा लागला होता. आता एटीपी क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम 68व्या स्थानावर पोहोचलेल्या नागलचा पुढील (राउंड आॅफ 16) सामना हा गुरूवारी(18 जुलै) अर्जेंटिनाच्या जागतिक क्रमवारीत 36व्या क्रमांकावर असलेल्या मारियानो नवोनशी होणार आहे.
दरम्यान, नागल हा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तसेच, रोहन बोपण्णा आणि एन श्रीराम बालाजी हे दोन्ही खेळाडू प्रथमच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुष दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करतील.





