Wimbledon Open 2024 : नागलने दुहेरीतही केली निराशा, पहिल्याच फेरीत पराभूत होण्याची नामुष्की…

Wimbledon Open 2024 : पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर भारताच्या सुमित नागललाही विम्बल्डनमध्ये पुरुष दुहेरीत पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बुधवारी नागल आणि त्याचा सर्बियन जोडीदार दुसान लाजोविच यांचा स्पेनच्या जौमे मुनार आणि पेड्रो मार्टिनेझ यांनी ६-२, ६-२ असा पराभव केला.
तत्पूर्वी नागलला सोमवारी रात्री एकेरीत सर्बियाच्या मिओमिर केकमानोविकने ६-२, ३-६, ६-३, ६-४ असे पराभूत केले होते. नागल प्रथमच विम्बल्डन पुरुष एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये खेळत होता. दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला नागल पाच वर्षांत विम्बल्डन पुरुष एकेरीचा मुख्य ड्रॉ सामना खेळणारा पहिला भारतीय आहे. प्रजनेश गुणेश्वरन 2019 मध्ये पहिल्या फेरीत बाहेर पडला होता.
Wimbledon Open 2024 : भारताच्या हाती निराशा, सुमित नागल पहिल्याच फेरीत पराभूत…
नागलचा सध्याचा हंगाम उत्कृष्ट राहिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉसाठीही तो पात्र ठरला होता. त्याने पहिल्या फेरीत कझाकस्तानच्या 31व्या मानांकित अलेक्झांडर बुब्लिकचा पराभव केला होता आणि ग्रँड स्लॅममध्ये सीडेड खेळाडूला पराभूत करणारा 35 वर्षांतील पहिला भारतीय पुरुष टेनिसपटू बनला होता.





