“उत्तर कोरियामद्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढले…’; किम जोंग उन यांनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

प्योंगयोंग, (उत्तर कोरिया) – उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी देशात आत्महत्या करण्यावर बंदीचे आदेश दिले आहेत. देशात आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड वाढल्यानंतर त्यांनी याबाबतचे गुप्त आदेश दिले असल्याची माहिती मिळते आहे.
“आत्महत्या करणे हा समाजवादाविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा आहे.’ असे त्यांनी म्हटले आहे. देशातील आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जर आत्महत्या झाली, तर त्याबद्दल संबंधित परिसरातील सरकारी अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल. आत्महत्या रोखण्यासाठीच्या उपाययोजनांसाठी या सरकारी अधिकाऱ्यांनी जबाबदारी घ्यायला हवी, असे किम यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
उत्तर कोरियामध्ये होत असलेल्या आत्महत्यांची नेमकी आकडेवारी उपलब्ध झालेली नसली तरी या आत्महत्यांचे प्रमाण गेल्या वर्षीापेक्षा 40 टक्क्यांनी वाढल्याचे “साऊथ कोरियन नॅशनल इंटिलिजन्स सर्व्हिस’ने मे महिन्यात म्हटले आहे.
उत्तर कोरियातील नागरिकांना अनेक प्रश्न सतावत आहेत. देशातील हिंसक घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. नागरिकांना आपले नियमित जीवन जगणे अवघड बनले आहे, असेही दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संघटनेने म्हटले आहे.
चोंगजिन आणि जवळच्या क्योंगसॉंग प्रांतात या वर्षी 35 आत्महत्या झाल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये सर्व कुटुंबाने सामुदायिक आत्महत्या केली आहे.





